सर्वसामान्यही धावले पूरग्रस्तांच्या मदतीला
निवलीवासीयांची व फ्री मेथॉडिस्ट चर्चची गावक-यांना मदत
जब्बार चीनी, वणी: तालुक्यात आलेल्या महापुराचा अनेक गावांना फटका बसला. गावामध्ये पुराचे पाणी शिरूर घरदार, शेत, जनावरांचे गोठे पाण्याखाली आले. यात शेतक-यांसह गावक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. मात्र तालुक्यातील नागरिकांनी या संकटसमयी ते एकटे नाही याची प्रचिती दिली. निवली गावक-यांतर्फे सेलू व चिंचोली गावात मदत करण्यात आली तर वणीतील फ्री मेथॉडिस्ट चर्चतर्फे झोला गावात मदत करण्यात आली.
निवली गावातील शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ व समस्त ग्रामक-यांनी गावातून लोकसहभागातून अन्न धान्य, जनावरांसाठी चारा व आर्थिक साह्य गोळा करून सेलू गावामध्ये जनावरांसाठी चारा तर चिंचोली गावामध्ये तांदूळ, गहू, डाळ व किराणा गरजू वस्तूंचे वाटप केले. गावक-यांवर संकट आले असले तरी ते एकटे नाही त्यांच्या पाठिशी आम्ही आहोत हे दाखवण्यासाठीच आम्ही मदतीचा खारीचा वाटा दिल्याची प्रतिक्रिया यावेळी गावक-यांनी दिली.
फ्री मेथॉडिस्ट तर्फे मदत
फ्री मेथॉडिस्ट चर्च वणी तर्फे झोला येथील पूरग्रस्त कुटुंबाला धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. चर्चचे पास्टर के. पी. मडावी यांनी व सहका-यांनी झोला ग्रामपंचायतीचे उपसरपंच सूर यांच्या कडे ही सर्व सामग्री सुपूर्द केली. गरजू कुटुंबाला ग्रामपंचायत स्वहस्ते या सर्व वस्तूंचे वाटप करणार आहे. मदतीसाठी गावक-यांनी चर्चचे आभार मानले
Comments are closed.