वाहतूक पोलिसांची अरेरावी, राजू तुराणकर यांची तक्रार
गाडीवर जय महाराष्ट्र लिहिल्याने शिविगाळ केल्याचा आरोप
विवेक तोटेवार, वणी: एका प्रकरणात वाहतूक पोलिसांनी हुज्जत घालून शिवीगाळ केल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी केला आहे. याबाबत तुराणकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री व तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
रविवारी 2 ऑगस्ट रोजी एका मुलाची गाडी वाहतूक पोलीस रवी सलाम यांनी पकडली. गाडीवर ‘जय महाराष्ट्र’ का लिहिले म्हणून त्यांना याबाबत शिविगाळ केली. त्यानंतर राजू तुराणकर यांनी रितसर 400 रुपए चालन भरून गाडी सोडवून घेतली. इथपर्यंत सर्व ठीक होते. मात्र त्यानंतर वाहतूक कार्यालयात वाहतूक पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल डाहूले यांनी राजू तुराणकर यांच्यासोबत हुज्जत घातली व त्यांच्या कार्यकर्त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले.
पोलीस इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी राजू तुराणकर यांना एखाद्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली. असा आरोप तुराणकर यांनी केला आहे. त्याला पोलीस रवी सलाम यांनी सहकार्य केल्याचा आरोप तक्रारीतून राजू तुराणकर यांनी केला आहे.
सदर पोऊनी प्रफुल डाहूले यांच्याविरोधात याअगोदरही अशाप्रकारच्या तक्रारी समोर आल्या आहेत. कोरपना येथील एका शिक्षकाच्या खिशातून 5000 रुपये काढल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांच्याविरोधात समाजवादी पक्षाचे रज्जाक पठाण यांनी तक्रारही दाखल केली होती.
रवी सलाम व पोऊनी प्रफुल्ल डाहूले यांच्यावर कारवाई करीत त्यांची बदली जिल्हाबाहेर करावी अशी तक्रार राजू तुराणकर यांनी केली आहे. सदर तक्रार ही गृहमंत्री, पालकमंत्री, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिवसेना सचिव, शिवसेना जिल्हाप्रमुख यांना देण्यात आली आहे.