‘कोरोना परवडला पण… कॉरन्टाईन नको !’

कोविड केंद्राची घेतली संशयीतांनी धास्ती

0

जितेंद्र कोठारी, वणी:  शासनाने कोरोनाच्या रुग्णांसाठी कोविड उपचार केंद्रात अलगीकरण कक्ष (आयसोलेशन सेन्टर)  तर संशयीतांसाठी कॉरन्टाईन सेन्टर तयार केले आहेत. जिल्ह्यात रुग्णांना यवतमाळ येथे तर संशयीतांना तसेच प्रत्यक्ष संपर्कात आलेले व रुग्णांच्या कुटुंबियांना विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येते. हे सेंटर बाहेरून चांगले आणि भव्य दिव्य दिसतात. परन्तू प्रत्यक्षात इथे दाखल व्यक्तींना वेगळीच अनुभूती येते. वणीमध्येही तिच परिस्थिती दिसून येत आहे.

वणी तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील लोकांना संस्थात्मक विलगीकरण (कॉरन्टाईन) साठी वणी-यवतमाळ मार्गावर परसोडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांची शासकीय वसतिगृहाच्या तीन मजली भव्य इमारतीत कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मार्गदर्शक तत्वानुसार आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा स्थानिक प्रशासन तर्फे करण्यात येते. मात्र, हे दावे पोकळच नव्हे तर बनवाबनवीचे असल्याचे वारंवार समोर आले आहे. तिथून बाहेर आलेल्या व्यक्तींकडून भयावह व हादरवून सोडणारा अनुभव सांगितला जात आहे.

परसोडा येथील कोविड सेंटरमध्ये स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करण्यात येते. परंतु प्रशासनाकडून तक्रारीची हवी तशी गंभीर दखल घेतली जात नाही. याबाबत सातत्याने कॉरन्टाईन असेलेली व्यक्ती व्हिडीओ शेअर करीत आहेत. विशेष म्हणजे यवतमाळ येथे उपचारासाठी गेलेल्या पण सध्या बरा होऊन परत आलेल्या रुग्णाचीही हीच प्रतिक्रिया आहे. वणीतील कोविड केअर सेन्टर येथील कारभार बघून भीती वाटली. मात्र जेव्हा यवतमाळला दाखल केले तेव्हा तिथे चोख व्यवस्था असल्याने जिवात जीव आला. संशयीतांना पॉजिटिव्ह वातावरण व सकस आहार मिळणे गरजेचे आहे. मात्र इथे ते दोन्ही ही नाही. अशी प्रतिक्रिया त्या व्यक्तीने ‘वणी बहुगुणी’ला दिली.

कोविड सेंटरमध्ये क्वारंटीन आणि पॉजिटीव्ह रुग्णांना जेवण पुरविण्याचा कंत्राट देण्यात आलं आहे. कंत्राटदारांकडून वेळोवेळी चहा, नाश्ता व पौष्टीक आहार पुरवठा अपेक्षित आहे. पण याबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत. जेवणासाठी दिलेली पोळी अर्धीकच्ची असल्याची तक्रार अनेक व्यक्तींनी केली आहे. एवढेच काय तर आंघोळीसाठी गरम पाण्याचीही सोय या ठिकाणी नाही. शिवाय कोविड केंद्रात सुरक्षा रक्षक, वीज, पाणी पुरवठा, शौचालय आणि बाथरूमची स्वतंत्र आणि पुरेशी व्यवस्था, आणि स्वच्छता नसल्याची बाबही समोर आली आहे.

कोविड सेंटरमध्ये साफ सफाई साठी रोजंदारी तत्वावर चार व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. परन्तु सदर सफाई कामगार क्वारंटाईन कक्ष आणि शौचालयची सफाई करीत नसल्याचे आरोप दाखल असलेल्या नागरिकांनी केले आहे. कोविड सेंटरमध्ये आवश्यक त्या सोयी सुविधेसाठी आरोग्य विभागाला 15 लाखाची निधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र त्या निधी चा उपयोग आरोग्य विभाग कुठे करीत आहे ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जीवन जगण्यासाठी संपर्कातील लोकांना कोविड केंद्रामध्ये दाखल केल्या जाते. मात्र कोविड सेंटरमध्ये क्वारंटीन करण्यात आलेले लोकांना जगण्यासाठी मरण यातनेची अनुभूती होत आहे. वणी येथील कोविड केंद्रातून सुट्टी मिळालेले नागरिकांचे तोंडातून “कोरोना परवडला पण…. कॉरन्टाईन नको” अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!