शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करा, काँग्रेसची मागणी
मुख्यमंत्री यांना निवेदन, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारला आता आपल्या दिलेल्या वचनांचा विसर पडत चालला असून, सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला आहे. नव्या खरिप हंगामाला जूनमध्ये सुरुवात होईल. शेतीकरिता झालेला खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ लावला तर खर्चापेक्षा उत्पन्न कमी, असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. त्यामुळे पुढील हंगामातील शेती कशी करायची व शेतीला खर्च कसा लावायचा या विवंचनेत शेतकरी आहेत. वणी, झरी, मारेगाव परिसरात काँग्रेस कमिटीने दौरे करून माहिती गोळा केली असता, परिसरातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
बी-बियाणे व खतांच्या किमतीत झालेली वाढ आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, शेतीकरिता मजुरांची कमतरता, परिणामी मजुरीच्या दरात झालेली वाढ या कारणांमुळे शेतकऱ्यांकडे घेतलेले कर्ज भरण्याची ऐपत राहिली नाही. त्यामुळे बरेच शेतकरी पुढील शेती कशी करायची, बँकेचे कर्ज कसे फेडायचे, मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न आहे.
बँकेकडून कर्ज वसुली सुरू
महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र सत्तेवर येताच, ही घोषणा हवेत विरली. आता कर्जवसुलीसाठी बँकांचा ससेमिरा सुरू झाला आहे. त्यामुळे कर्जमाफी करावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष घनश्याम पावडे, राजू कासावार, प्रा. टिकाराम कोंगरे, ओम ठाकूर, मोरेश्वर पावडे, रूपेश ठाकरे, वंदना धगडी, उत्तम गेडाम, राजेंद्र कोरडे, अनंतलाल चौधरी, प्रशांत गोहकार, विकी पानघाटे, प्रमोद लोणारे आदींनी केली आहे.
Comments are closed.