क्रांतीदिनानिमित्त काँग्रेस कमिटीतर्फे शहिदांना अभिवादन
वणीतील हुतात्मा झालेल्या क्रांतीकारांना मानवंदना
जब्बार चीनी, वणी: 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गांधी चौक व टिळक चौक येथे वणी शहर काँग्रेस कमिटी तर्फे हुतात्मा शहीद स्मारकाला व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्यासाठी 9 ऑगस्ट हा देशभरात क्रांतीदिन म्हणून साजरा केला जातो.
9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’चा नारा दिला होता. स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस अनोळखी झाला आहे. सर्वाच्या हृदयात क्रांतिवीरांची ती मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित आहे. त्यामुळे असे दिवस केवळ औपचारिकता म्हणून साजरा व्हायला नको. क्रांतीविरांच्या बलिदानाची मशाल धगधगत ठेवणे आजच्या काळात गरजेचे आहे. असे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद निकुरे, प्रमोद इंगोले, भास्कर गोरे, प्रमोद लोणारे, सुरेश बन्सोड, अरुण चटप, रवि कोटावार, भैय्या बदखल यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गांधीजींनी 9 ऑगस्ट 1942 रोजी ‘छोडो भारत’ची गर्जना आणि ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे देशभर क्रांतीची ज्योत पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरुवात झाली. यामुळे ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. वणीतही या दिवशी मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले होते. स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या क्रांतीविरांच्या आठवणी कायम जाग्या राहाव्यात यासाठी टिळक चौक येथे हुतात्मा स्मारक देखील आहे.