धानोरकरांची उमेदवारी काँग्रेससाठी नवसंजीवनी ठरणार का ?

अन्वयार्थ: अशोक आकुलवार यांचा विशेष वृत्तांत

0

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: पक्षाच्या राज्य नेतृत्वाने शिफारस करूनही ज्यांची उमेदवारी दिल्लीश्वरांनी घोषीत न केल्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करून आपल्या राजीनाम्याचा मनोदय बोलून दाखविला होता. अशा सुरेश (बाळू) धानोरकरांना अखेर शेवटच्या क्षणी चंद्रपूरची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. धानोरकरांची जाहीर झालेली उमेदवारी हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा विजय मानल्या जात आहे. 

असे असले तरीही काँग्रेसच्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्याच्या विनम्र माघारीची किनार सुद्धा या उमेदवारीला आहे. अखेरपर्यंत चिकाटीने लढून, खेचून आणलेली ही उमेदवारी चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसमध्ये नवसंजीवनी निर्माण करणारी ठरेल का? हा आता कळीचा मुद्दा आहे. या मतदार संघातील सहाही विधानसभा क्षेत्रे काँग्रेसचे बालेकिल्ले मानल्या जात होते. या घडीला यातील एकही विधानसभा क्षेत्र काँग्रेसच्या ताब्यात नाही. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात अडगळीत गेलेल्या काँग्रेससाठी धोनोरकरांच्या रूपाने मिळालेला युवा चेहरा काँग्रेससाठी कदाचित आशेचा किरण ठरू शकतो.

पाचव्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विरुद्ध उमेदवार देतांना उमेदवाराचा चेहरा नवीन व युवा असावा , त्याचे स्वतःचे नेटवर्क प्रबळ असावे, आणि सोशल इंजिनिअरिंगच्या निकषात तो बसणारा असावा असे काही निकष अशोक चव्हाणांनी ठेवले होते आणि त्यानुसार त्यांनी दिल्ली दरबारी धानोरकरांच्या नावाची शिफारस केली होती. परंतु विदर्भात महाआघाडीने एकही तेली समाजाचा उमेदवार दिले नसल्याचे कारण पुढे करून दिल्ली दरबाराने धानोरकरांच्या नावावर फुली मारली होती.

केंद्र व राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता असल्यामुळे चंद्रपूर मतदार संघात भाजपचा प्रभाव अधिक घट्ट झाला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना कुठलीच ‘स्पेस’ उरली नाही. त्यामुळे या मतदार संघातील काँग्रेसच्या नेत्यांसोबतच सामान्य कार्यकर्यांचीसुद्धा घुसमट व्हायला लागली. शिवसेनेतून आयात केलेला का असेना पण पक्षाला ‘नव्या दमाचा नवा शिपाई’ मिळाल्यामुळे खासगीत अनेक नेते नाराज असले तरीही बहुतांश कार्यकर्ते कमालीचे उत्साही असल्याचे दिसतात.

धानोरकरांना ही लढाई सोपी जाणार नाही. ज्या सामाजिक घटकाचा व्होटर बेस त्यांच्या विजयासाठी गृहीत धरण्यात येतो, त्या व्होटर बेसवर शिवसेना आणि भाजपाचा सुद्धा प्रभाव आहे. हा व्होटर बेस धानोरकर काँग्रेसकडे कसे वळवतात यातच त्यांचे राजकीय कसब दिसणार आहे. याशिवाय धानोरकरांसाठी ज्यांनी अधिक आढेवेढे न घेता माघार घेतली त्याही निष्ठावान कार्यकर्त्याचा सामाजिक व्होटर बेस भाजपकडे झुकण्याची अधिक प्रमाणात शक्यता निर्माण झाली आहे.

एकमात्र खरे, धानोरकरांच्या उमेदवारीने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण झाली आहे. ही चेतना धानोरकर नवसंजिवनीत कसे रूपांतरित करतात, हे पाहणे उद्बोधक ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.