कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेखवरील खोटे गुन्हे मागे घ्या, कॉंग्रेस आक्रमक

जितेंद्र कोठारी, वणी: दीपक चौपाटी येथे 9 ऑगस्ट रोजी घडलेल्या मारहाण प्रकरणात कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार ग्यासूदीन शेख यांच्यावर वणी पोलिस स्टेशनमध्ये दाखल खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी वणी विधानसभा कॉंग्रेसने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेता विजय वड्डेटीवार, पोलिस महानिरीक्षक, अमरावती विभाग, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी व ठाणेदार वणी यांना शनिवार 12 ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात  आले.

माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांचा मारहाणीच्या प्रकरणाशी तीळमात्रही संबंध नसून जेव्हा घटना घडली तेव्हा इजहार शेख वणी शहरातही उपस्थित नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. इजहार शेख यांच्यावर तक्रार सूडबुद्धीने केलेली असून त्यांचा समाजात असलेल्या सामाजिक व राजकीय वलय संपविण्याकरीता केलेल्या डाव असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.  

इजहार शेख मागील 10 वर्षापासून सामाजिक, राजकीय, धार्मिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहे. कोरोना काळात त्यांनी समाजाला केलेली मदत व त्यांचे कार्य लक्षणीय आहे. अशा निर्दोष व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करुन समाजात एक नवीन पायंडा निर्माण होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांच्यावर दाखल खोट्या गुन्ह्याची चौकशी करून इजहार शेखवरील लावलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. अन्यथा वणी विधानसभा कॉंग्रेसतर्फे लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उप विभागीय पोलिस अधिकारी व ठाणेदार यांना निवेदन देताना राजीव कासावार, डॉ. महेंद्र लोढा, आशीष खुलसंगे,  राकेश खुराणा, ओम ठाकूर, नईम अजीज, अभिजीत सोनटक्के, घनश्याम पावडे, अशोक पांडे, तालुका अध्यक्ष संध्या बोबडे, शालिनी रासेकर, विजयाताई आगबत्तलवार, महिला शहर अध्यक्ष सविता ठेपाले, नीलिमा काळे, मंगला झिलपे, वंदना दगडी, ललिता बरशेट्टीवारसह कॉंग्रेसचे शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते.

Comments are closed.