दीपक चौपाटी येथे मारहाण प्रकरणातील 3 आरोपींना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : आम आदमी पक्षाचे वणी तालुका संयोजक तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता निखिल ढुरके यांना मारहाण प्रकरणातील 3 आरोपींना वणी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले अस्लम अब्बास पठाण (27), वसीम शेख (28) व ताहीर शेख रफिक शेख (28) सर्व रा.वणी यांना वणी न्यायालयात हजर केले असता तिघांना 14 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बुधवारी 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 वाजता दीपक चौपाटी परिसरात दुचाकीवर आलेल्या काही युवकांनी निखिल ढुरके यास लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. मारहाणीत निखिलच्या हाताला व पायाला फ्रॅक्चर झाले. याबाबत फिर्यादी निखिल ढुरके यांनी गुरुवारी रात्री वणी पोलीस स्टेशनमध्ये 6 जणांविरुद्ध तक्रार नोंदविली. 

या प्रकरणात वणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल अपराध क्रमांक 807/23 नुसार इजहार ग्यासुद्दीन शेख (45), असलम अब्बास पठाण (27) व वसीम शेख (28), शेख रफीख शेख (28), अल्ताफ चिरी (27) व एक अनोळखी इसम (वय अंदाजे 50) अशा 6 जणांवर कलम 307, 326, 143, 147, 148, 149, 506, 109 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार 3 (2) (VA), 3 (2), 3 (V), 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्यातील गैरअर्जदार इजहार ग्यासुद्दीन शेख मंगळवार 8 ऑगस्ट पासून कामानिमित्त परदेशात गेल्याची माहिती आहे. मारहाण करणाऱ्या 5 आरोपी पैकी तिघांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली असून दोघंजण फरार आहे.

Comments are closed.