शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, काँग्रेसचे निवेदन
वणी विधानसभा काँग्रेसतर्फे शेतक-यांच्या मागणीसाठी निवेदन
सुरेंद्र इखारे, वणी: वणी शहर व तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने शेतक-यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले. गुरुवारी माजी आमदार वामनराव कासावार व अॅड. देविदास काळे यांचा नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले, त्यांना तातडीने शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
वणी, झरी आणि मारेगाव परिसरात अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे शेतक-यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच शेतक-यांनी दुबार तर कुठे तिबार पेरणी केली आहे. त्यातच आता अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे माती वाहून गेली. पुराने खरडून नेली. पीक पुरात वाहून गेलं त्यामुळे काही शेतक-यांवर तिबार तर काहींवर चौबार पेरणीची वेळ आली आहे.
अस्मानी संकटाने शेतकरी पुरता खचला आहे. त्यामुळे वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील शेतक-यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी माजी आमदार वामनराव कासावार, ऍड. देविदास काळे, राकेश खुराना, राजाभाऊ पाथ्रडकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.