ब्रेकिंग अपडेट: बेवारस कारमध्ये आढळला प्रतिबंधित तंबाखू

महादेव नगरीत पोलिसांची कारवाई, तंबाखू तस्कर कधी होणार गजाआड?

विवेक तोटेवार, वणी: शहरातलगत असलेल्या चिखलगाव जवळील महादेव नगरी येथे बेवारस उभ्या असलेल्या एका कारमध्ये प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला आहे. रात्री उशिरा 12 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तंबाखूचा मोठा साठा आढळून आला असला तरी हा तंबाखू तस्कर कोण? याचा अद्याप उलगडा झालेला नाही. पोलीस याबाबत तपास करीत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्याचे माहेरघर झालेल्या वणी शहरात पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आलेले दिसत आहे. आता वणी पोलिसांनी तंबाखू तस्करांकडे आपला मोर्चा वळवला आहे. रविवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्री पोलिसांना खब-यांकडून महादेव नगरी येथील पाण्याच्या टाकीजवळ एक वेगन आर कार (MH31 BC4775) संशयास्पदरित्या उभी असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक रात्री 12 वाजताच्या सुमारास महादेव नगरीत पोहोचले असता तिथे त्यांना सदर कार आढळून आली. त्यांनी गाडीची झडती घेतली असता त्यात मजा कंपनी व काही इतर कंपनीच्या सुगंधी तंबाखूच्या पेट्या आढळून आल्यात. या कार्यवाहीत नेमका किती माल आढळला याची अद्याप माहिती नसली, तरी मजा तंबाखूच्या 9 पेट्या व इतर कंपनीचा तंबाखू असल्याची माहिती आहे.

तंबाखू तस्कर कोण?
शहरात मोठ्या प्रमाणात तंबाखू माफीयांचे जाळे आहे. मात्र कार्यवाही होत नसल्याने तसेच ‘अर्थ’पूर्ण संबंधांमूळे तंबाखू तस्करांचे चांगलेच फावत आहे. महादेव नगरीत एका तंबाखू तस्कराने चांगलेच बस्तान मांडले आहे. इथूनच प्रतिबंधीत तंबाखू शहरात तसेच परिसरातील ग्रामीण भागात सप्लाय होतो. या ठिकांनी याआधीही कार्यवाही झाली आहे. मात्र निगरगट्ट झालेले तंबाखू तस्कर ‘सेटिंग’ लावून काही दिवसांनी पून्हा आपला धंदा सुरू करतात.

कार्यवाहीत जप्त करण्यात आलेला तंबाखू तस्कर कोण याची सध्या चांगलीच चर्चा रंगत आहे. तपासात या तस्कराचे पितळ उघडे पडणार आहे. सदर कारवाई ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोउनि प्रवीण हिरे व पोकॉ वसीम शेख यांनी केली.
(अधिक माहिती येताच ही माहिती अपडेट केली जाईल.)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.