सुशील ओझा, झरी: वणीनंतर आता झरी तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यातून यवतमाळ येथे उपचारासाठी गेलेल्या महिलेचा व तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला असून त्या महिलेची कोरोनाची चाचणी केली असता ती पॉजिटिव्ह आली आहे. दरम्यान प्रशासन सतर्क झाले असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की झरी तालुक्यातील महादापूर येथील महिलेला लग्नानंतर मेटिखेडा जवळील रुढा या गावी दिले होते. ती गर्भवती असल्याने ती 10 मार्च रोजी माहेरी आली होती. 13 मार्चला ती सोनोग्राफीसाठी अदिलाबाद येथे गेली होती. काल गुरुवारी दिनांक 2 जुलै रोजी पोट दुखत असल्याने तिला झरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. संध्याकाळी 5.30 ते रात्री 10 पर्यंत सदर महिला ही तिथेच होती. मात्र प्रसुती कळा येत नसल्याने त्या महिलेला पांढरकवडा येथे उपचारासाठी रेफर केले. पांढरकवडा येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. रातोरात तिला यवतमाळला हलवण्यात आले.
सकाळी महिलेला प्रसुती कळा आल्या. मात्र प्रसुती होताच काही वेळातच नवजात बाळाचा मृत्यू झाला. थोड्या वेळात महिलेला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. तिथल्या डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी तिला लगेच कॉरन्टाईन कक्षात भरती केले. तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र तपासणी रिपोर्ट येत पर्यंत सदर महिलेचा मृत्यू झाला होता. रिपोर्ट आल्यावर सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली, कारण सदर महिलेचा रिपोर्ट पॉजिटिव आला. दरम्यान याची माहिती लगेच तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आली.
संपर्कातील व्यक्तींना ट्रेस करणे सुरू – तालुका वैद्यकीय अधिकारी
सदर महिला कोरोना पॉजिटिव्ह असल्याची माहिती मिळताच प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश प्राप्त झाले आहे. त्यानुसार महादापूर हे संपूर्ण गाव सिल केले आहे. जे व्यक्ती सदर महिलेच्या थेट संपर्कात आले अशा हाय रिस्क व्यक्तींना ट्रेस करण्यात येत असून त्यांना लगेच कॉरन्टाईन करण्यात येणार आहे. याशिवाय ज्या व्यक्ती कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:हून समोर यावे.
– डॉ. मोहन गेडाम, तालुका वैद्यकीय अधिकारी
महादापूर या गावात 50 घरं असून या गावाची लोकसंख्या ही 364 आहे. सदर महिलेची तपासणी करण्यासाठी रोज आशा वर्कर्स येत होत्या. ती महिला प्रसुतीसाठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात त्यानंतर पांढरकवडा व त्यानंतर यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या महिलेच्या संपर्कात लोक आलेत. याशिवाय ज्या ऍम्बुलन्सने त्या महिलेला आधी झरी वरून पांढरकवडा व त्यानंतर यवतमाळला हलवण्यात आले. त्या ऍम्बुलन्सचा ड्रायव्हर तसेच तिच्या सोबत असणारे कुटुंबातील व्यक्तीही त्या महिलेच्या संपर्कात आले आहेत.
झरीत कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती पसरताच संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या महिलेला कोणत्या व्यक्तीपासून कोरोनाचा संसर्ग झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र त्या महिलेचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याने सर्व पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.