मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रिंगण’च्या संत सोपानदेव विशेषांकाचं प्रकाशन

पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात रिंगणचा प्रकाशन सोहळा थाटात

0

बहुगुणी डेस्क, पंढरपूर:  संत परंपरेचा सामाजिक आणि सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगणच्या आषाढी विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. कोरोनाच्या काळातही पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात रिंगण प्रकाशनाचा शिरस्ता कायम राहिला. दरवर्षी एका संताचा पत्रकारितेच्या नजरेनं शोध घेणं हे रिंगणच्या अंकाचं वैशिष्ट्य असून यंदा संत सोपानदेव यांचा शोध त्यातून घेण्यात आला आहे.

यंदाच्या रिंगण अंकात संत सोपानदेवांशी संबंधित आपेगाव, आळंदी, सासवड, पंढरपूर या गावांचे रिपोर्ताज आहेत. ते अनुक्रमे दादासाहेब घोडके, राहुल बोरसे, अभय जगताप, सुनील दिवाण यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणांना भेटी देऊन लिहिलेले आहेत. डॉ. सदानंद मोरे, डाॅ. रंगनाथ तिवारी, देवदत्त परुळेकर, डॉ. श्यामसुंदर मिरजकर, नंदन रहाणे या मान्यवरांसह अन्य पत्रकार अभ्यासकांचेही लेख अंकात आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे यांनी अंकाचं कवर केलं आहे. अंकाची किंमत १०० रुपये आहे. अंक हवा असल्यास सुधीर शिंदे (९८६७७५३२८०) आणि प्रदीप पाटील (९८६०३३१७७६) यांच्याकडे नोंदणी करता येईल.

रिंगणचे आजवर संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत विसोबा खेचर, संत गोरा कुंभार, संत सावता माळी या संतांवर अंक प्रकाशित करण्यात आलेले आहेत. हे अंक www.Ringan.in या वेबसाईटवरून फ्री डाउनलोड करून वाचता येतात.

रिंगणचे संपादक सचिन परब म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रिंगणचा अंक प्रकाशित होणार की नाही, याबाबत साशंक होतो. मात्र आज तो प्रकाशित झाला, याचा आनंद आहे. पत्रकाराचं काम पडद्यामागे राहून काम करण्याचं. सोपानकाकांचा शोध घेताना नेमकं हेच जाणवलं. त्यांनी पडद्यामागे राहून शांतपणे आपलं काम केलं. ‘मला गुरुंनी ज्ञान दिलं. ते ज्ञानदेवांनी उलगडून सांगितलं. मुक्ताईनं त्यातला अनुभव शोधला. पण त्याचं संपादन सोपानदेवांनीच केलं’ असं निवृत्तीनाथांनी त्यांच्याबद्दल सांगितलंय. ते खऱ्या अर्थानं संपादक होते.’

Leave A Reply

Your email address will not be published.