तालुका प्रतिनिधी, वणी: ‘लाख छुपाओ छुप न सकेगा राज हो कितना गहरा, दिल की बात बता देता है असली नकली चेहरा’ हे ‘असली नकली’ या चित्रपटातील गीत आयुष्याच अर्धशतक पूर्ण केलेल्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. दुर्दैवाने आज जगभर कोरोना विषाणूची लागण सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभर लॉक डाऊन करण्यात आले. दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाली. त्यामुळे शरीराचं बाह्य सौंदर्य वाढविण्यासाठी उभारलेली सौंदर्य प्रसाधन स्टोअर्स, ब्युटी पार्लर, सलून बंद झाली. परिणामी सर्ववयोगटातील आबालवृद्धांचे खरे नैसर्गिक चेहरे उघडे पडले आहेत.
‘शरीर धड तर मन धड’ अशी मराठीत म्हण आहे. अर्थातच आपले मन प्रसन्न ठेवण्यासाठी शारीरिक सुदृढता आवश्यक आहे. म्हणून शरीर निरोगी राखण्यासाठी व्यायामाची गरज आहे. यासाठी विविध प्रकारचे खेळ खेळणे, पोहणे, धावणे, व्यायाम शाळेत कसरती करणे, चालणे, फिरणे आदी बाबी नियमितपणे कराव्या लागतात. मात्र आजच्या ‘माहिती आणि तंत्रज्ञान’ युगात शारीरिक सौंदर्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला दिसून येतो.
बहुतांश जण शरीराच्या अंतर्गत सौंदर्यापेक्षा बाह्यसौंदर्य राखण्यासाठी धडपडत असतात. मग त्यासाठी मसाज केंद्र, सलून दुकान, ब्युटी पार्लरचा आधार घेत विविध प्रकारची हेअर स्टाईल करणे, फ्रेशियर करणे, केसाला काळी, लाल, केसरी मेहंदी लावत सौंदर्य फुलविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. आणि अल्प दिवसांसाठी का होईना त्यांना समाधान मिळते. मात्र हे सर्व वरचेवर करावं लागतं.
मात्र सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉक डाऊन सुरू आहे. सौंदर्य प्रसाधन स्टोअर्स, मसाज केंद्र, ब्युटी पार्लर, सलूनची दुकाने बंद आहे. परिणाम स्वरूप बहुतांश युवक, वृद्ध व्यक्ती पांढरे केस, दाढी वाढलेले दिसून येत आहे. स्त्रियांच्याही डोक्यावरील पांढरे केस दृष्टीस पडायला लागले. यामुळे मुले, मुली, स्त्री, पुरुषांसह वृद्धांचेही खरे अर्थातच नैसर्गिक चेहरे दिसून येत आहेत. यामुळे कळत – नकळत अनेक जण ‘असली नकली’ चित्रपटातील गीताच्या ‘लाख छुपाओ छुप न सकेगा राज हो कितना गहरा, दिल की बात बता देता है असली नकली चेहरा’ या ओळी मिस्कीलपणे गुणगुणताना दिसून येतात.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post