वणीकरांना दिलासा, आज एकही रुग्ण नाही…

4 निगेटिव्हना मिळणार विलगीकरण कक्षातून सुट्टी

0

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवसही वणीकरांसाठी दिलासादायक ठरला. आज वणीतील एकही रिपोर्ट पॉजिटिव्ह आला नाही. आतापर्यंत वणीतील 68 व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यातील 59 रिपोर्ट प्राप्त झाले असून 54 व्यक्ती निगेटिव्ह आलेल्या आहेत तर 3 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत. तर उरलेल्या 2 व्यक्तींचे सॅम्पल पुन्हा घेतले जाणार आहे. 9 रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहेत. शहरात सध्या 71 व्यक्ती हाय रिस्क (अती जोखिम) मध्ये असून 118 व्यक्ती लो रिस्कमध्ये आहेत. सध्या वणीत कोरोनाचे सहा रुग्ण आढळले आहेत.

4 जणांना मिळणार सुट्टी…
परसोडा येथे कोविड केअर सेन्टरमध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या मात्र लो रिस्कमध्ये असलेल्या 4 व्यक्तींना कोविड केअर सेन्टरमधून आज सुट्टी देण्यात येणार आहे. लो रिस्क मधल्या या 4 व्यक्तींच्या हातावर स्टॅम्प मारण्यात आला असून त्यांना होम कॉरेन्टाईन राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात हातावर स्टॅम्प असलेली व्यक्ती जर बाहेर आढळली, तर त्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार, अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली.

टिळक चौकात परिस्थिती सामान्य होती

वणीकरांनी घेतली कोरोनाची धास्ती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. अऩेक लोकांनी सध्या घराबाहेर न पडण्यालाच पसंती दिली आहे. त्यामुळे रस्त्यावरची गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे. एरव्ही नेहमी ट्रॅफिक जाम असणारा शहरातील मुख्य मार्केट गांधी चौकात तुरळक गर्दी दिसून आली. तसेच नेहमी गजबजलेली दिपक टॉकीज चौपाटीवरची गर्दीही कमी झाली आहे. टिळक चौकात मात्र परिस्थिती सर्वसामान्य आहे. तसेच कारवाईच्या धास्तीने का होईना आता अनेक लोक मास्क, रुमाल याचा वापर करीत आहेत.

ग्रामीण भागातून वणीत येणा-यांच्या संख्येतही विलक्षण घट झाली आहे. वणीत मुख्यत: खरेदीसाठी तसेच वैद्यकीय कामासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोक येतात. मात्र आता ग्रामीण भागातील लोकांनीही कोरोनाची धास्ती घेतली आहे. ग्रामीण भागातील लोकांनी वणीत येणे टाळल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर पडून दुकानात तुरळक ग्राहक दिसून आल्याची माहिती दुकानदारांनी दिली.

दीपक टॉकीज चौपाटीवरची गर्दी ओसरली

तळीरामांचा ‘कॉर्टर’ऐवजी ‘बम्पर’वर जोर
वणीत कोरोनाच्या रुग्णाचा आकडा वाढत असल्याने शहरात लवकरच लॉकडाऊन व जनता कर्फ्यू लागणार असल्याची अफवा चांगलीच पसरली आहे. लॉकडाऊनमुळे वाईन शॉप बंद असलेल्या काळात झालेला त्रास टाळण्यासाठी तळीरामांनी सध्या ‘स्टॉक’ करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे कॉर्टरऐवजी बम्पर घेण्यालाच मद्यप्रेमी पसंती देत आहे. सध्या वणीतील एकाच वाईन शॉप सुरू असल्याने सकाळपासूनच वाईन शॉपवर मोठी रांग दिसून येत आहे. ग्रामीण भागातूनही केवळ ‘बम्पर’ आणण्यासाठी ग्राहक वणीत येत आहेत. अनेक ग्राहक प्रिंट रेट पेक्षा अधिक दराने  विक्री होत असल्याचीही तक्रार करीत आहेत.

नंबर लागण्याची वाट पाहत असताना ग्राहक

वणीत पुन्हा लॉकडाऊन ?
सध्या लॉकडाऊन नाही तर अनलॉकचा काळ आहे. वणीत सध्या केवळ कंटेनमेन्ट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) पुरतेच संपूर्ण लॉकडाऊन आहे. कोरोनाचे रुग्ण सापडताच वणीत पुन्हा लॉकडाऊन व जनता कर्फ्यू लागणार अशी अफवा पसरत आहे. मात्र अद्याप याबाबत प्रशासकीय स्तरावर कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. काही व्यापारी व सुजाण नागरिक समोर येऊन शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन व संचारबंदीची मागणी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.