जब्बार चीनी, वणी: वणीत गेल्या काही काळापासून ‘पाटी विथ डिफरन्स’चा दावा करणा-या पक्षातील सदस्य व लोकप्रतिनिधी विविध प्रकरणात अडकताना दिसत असून नुकतंच भाजपचे नगरसेवक प्रशांत निमकर यांना दारू तस्करीच्या आरोपावरून पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. याआधी एक्षातील आणखी एका नगरसेवकावर एका प्रकरणात निलंबनाची कार्यवाही करण्यात आली होती. त्यासोबत पक्षातील दोन गट एकमेकांवर कुरघोडी करून एकमेकांची गोची करतानाचे चित्र उघडपणे दिसत असल्याने पक्षाला गटबाजीची लागण झाल्याची चर्चाही अलिकडे शहरात चागंलीच रंगत आहे.
कुंभा येथील दारू तस्करी प्रकरणी वणी नगर परिषदेचे प्रभांग क्रमांक 6 चे नगरसेवक प्रशांत निमकर यांना 17 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी शनिवारी त्यांच्यावर 6 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. निमकर हे अपक्ष नगरसेवक म्हणुन निवडून आले होते. नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून पक्षाचे सदस्यत्व घेतलेले होते. दोन वर्षापूर्वी प्रभाग क्र.7 चे भाजपाचे नगरसेवक धीरज पाते यांना सुद्धा असेच एक प्रकरणात अडकल्याने निलंबीत केले होते.
पक्षाला गटबाजीची लागण ?
सध्या पक्षात गटातटाचे राजकारण चांगलेच डोकं वर काढत आहे. निमकर यांच्या प्रकरणातही एका नेत्याने त्यांना वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच काही दिवसांआधीच भाजपच्या एका पदाधिका-यावर एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल करण्यामागे दुस-या गटाच्या एका नेत्याने फुस लावली असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यावरून चांगलेच ‘बातमी’ युद्ध रंगले होते. याआधी शहरात केवळ अंतर्गत गटबाजीची धुसपुस व्हायची. मात्र या प्रकरणातून शहरात पहिल्यांदाच अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली.
अध्यक्ष निवडीचे प्रकरण ते मुख्याधिका-यांची बदली
मागील वर्षी फेब्रुवारी मध्ये पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीत शहर अध्यक्ष म्हणून श्रीकांत पोटदुखे यांची निवड झाली होती. या निवडीवर एका गटाने आक्षेप घेतला होता. न. प. मुख्याधिकारी यांच्या बदली संदर्भातही दोन्ही गटात चांगलीच जुंपली होती. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी परिसरातील भाजपा नेत्यांविषयी संघामध्ये कमालीची नाराजी होती. ही नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या पदाधिका-यांनी ऐनवेळी चांगलीच धावपळ करावी लागली होती. वणी विधानसभा निवडणुकीच्या आधीही या गटबाजीमुळे संघातील व्यक्तीला उमेदवारी दिली जावी यासाठी संघाने प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही – आ. बोदकुरवार
भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. ज्यांना पक्षात रहायचे व पक्षात काम करायचे असेल तर त्यांनी पक्षाची शिस्त पाळलीच पाहिजे. कार्यकर्ते व सदस्यांचे पक्षाच्या संस्कृतीला शोभेल असेच वर्तन असायला पाहिजे. जिल्हाध्यक्षांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यापुढे कितीही मोठा पदाधिकारी असेल तरी बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. पक्षाच्या गटाबाजीबाबत बोलताना त्यांनी पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नसल्याचे सांगितले.