सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात रोहणी व मृग नक्षत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली. मात्र सहा-सात दिवसांपासून पावसाने दडी मारली. शेतात पेरण्या केलेल्या कापूसाच पीक धोक्यात आले आहे. दोन दिवसात पाऊस न आल्यास आठ हजार हेक्टर क्षेत्रावर दुबारपेरणीचे संकट ओढण्याची भीती कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.
रोहणी व मृग नक्षत्राच्या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. मात्र, नैऋत्य मान्सूनच्या प्रवासात १२ जून ते २२ जूनपयंर्त पाऊस पडणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. तालुक्यातील अडेगाव, मुकुटबन, पाटण, शिबला, माथार्जुन आणि झरी परिसरातील शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
तालुक्यात साधारणत: ८ हजार ३६५ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकाची लागवड झाली आहे. तर ज्वारी, सोयाबीन पिकाची पेरणी अजूनही झाली नाही. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, पावसाने दगा दिल्याने कपाशीची पेरणी केलेले शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. पावसाने दडी मारल्याने तालुक्यात पेरणी केलेले ८ हजार ३६५ हेक्टर वरील पिके धोक्यात आली आहे.
पुन्हा शेतकरी पावसाअभावी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक अडचणीत येऊन हवालदिल होण्याची चिंता बळकावत आहे. तर पेरणी केलेले बियाणे जमिनीत कोमेजून जात आहेत. परिणामी, शेतकऱ्यांपुढे पुन्हा दुबारपेरणीचे संकट बळावले आहे..