जैन ले आऊटमध्ये मध्यरात्री थरार ! ‘बादशाह’ निघाला भुरटा

शेजा-याची समयसूचकता, चोरटा अलगद अडकला ट्रॅपमध्ये

बहगुणी डेस्क, वणी: मध्यरात्रीची निरव शांतता होती. एका घरी चोर शिरला. पण त्याला माहित नव्हतं की आजची रात्र त्याच्यासाठी “ट्रॅप” आहे. शेजाऱ्यांनी एकत्र येऊन घराला घेराव घातला, चोराने पळण्याचा प्रयत्न केला, पण तो शेवटी हाती लागलाच. जैन ले आऊटमध्ये सोमवारी 9 मार्चच्या मध्यरात्री (10 मार्च) हा थरार घडला. चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Birthday

तक्रारीनुसार, कुनाल अनिल पाऊनकर (24) हे जैन लेआऊट, वणी येथील रहिवासी आहे. ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दरम्यान 9 मार्च रोजी पहाटे सुमारे 2.30 वाजताच्या सुमारास सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे (वय 30, रा. पोहना, ता. वणी) हा त्यांच्या घराच्या आवारात शिरला व घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चोरटा सापडला ट्रॅपमध्ये
यावेळी घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी चोरट्याला आत शिरू दिल्यानंतर तत्काळ बाहेरून दरवाजा बंद केला. त्यानंतर त्यांनी इतर शेजाऱ्यांना याची माहिती दिली. परिसरातील नागरिकांनी घराभोवती सापळा रचत पोलिसांनाही कळविले. दरम्यान चोरट्याने बाथरूमची खिडकी तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क नागरिकांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होताच आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(4), 305(अ) व 62 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विशाल राठोड करीत आहेत.

Comments are closed.