नात्यांची सुरेल गुंफण ‘ऐसी कळवळ्याची जाती’…..

माधवराव सरपटवार यांच्या पुस्तिकेचं रसग्रहण

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: माझी ‘जातीयवादी आई’ हे पहिलंच प्रकरण वाचकांना शीर्षकासह धक्का देतं. अशा अनेक पूर्वजांच्या स्मृतींचा पुष्पगुच्छ माधवराव उपाख्य बाळासाहेब सरपटवार यांनी आपल्या ‘ऐसी कळवळ्याची जाती’ या पुस्तिकेत मांडला आहे. आजच्या काळात नात्यांची बांधीलकी सैल होत चालली आहे. नव्या पिढीपर्यंत आपल्या पूर्वजांच्या स्मृती पोहचवण्याचं कार्य सरपटवार यांनी केलं आहे. सहज बोलावं अशी ओघवती भाषा त्यांनी आपल्या लेखनात वापरली.
त्यामुळं ‘ये हृदयीचा ते हृदयी’ थेट संवाद होतो. ‘करी लाभावीण प्रीती’ या संत तुकोबारायांच्या अभंगाच्या ओळीचं शीर्षक घेऊन लेखकानं आपल्या भावना व्यक्त केल्यात.
या छोट्याशा पुस्तिकेत त्यांचे आई-वडील आणि अन्य आप्तांवरचे निवडक लेख आहेत. ते अनेक वृत्तपत्रांमधून प्रकाशित झालेत. याचंच संकलन म्हणजे ही पुस्तिका. लोकनायक बापुजी अणे म्हणजे वणीचं वैभवं. संपूर्ण विदर्भ आणि महाराष्टाचा गौरव. त्यांनी माधवराव सरपटवार यांचे काका नारायणराव यांच्या ‘पदाती’ या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली होती.
यात त्यांनी या परिवारासोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा ऊहापोह केला होता. विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी ‘पूर्वजांचा सार्थ अभिमान’ या शीर्षकाखाली प्रस्तावना लिहिली.आपली पूर्वजांची परंपरा एखाद्या ऋषीच्या चरणापर्यंत जाते असा उल्लेख त्यांनी केला. त्यांच्या आईवरच्या लेखाला तर सानेगुरूजींच्या मातृहृदयी लेखनाची सर असल्याचं त्यांनी नमूद केलं.
पाठ्यपुस्तकांत प्रतिज्ञा असते. त्यात एक वाक्य आहे, ‘या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन’. सरपटवार यांनी खरोखरच हे वाक्य प्रामाणिकपणे अमलात आणण्याचा प्रयत्न केला. ख्यातनाम गायिका, पंडित हृदयनाथ मंगेशकरांची सुकन्या तथा स्वरसम्राज्ञी लतादिदींची भाची म्हणजे डॉ. राधा मंगेशकर. यांनी त्यांचे सरपटवार यांच्यासोबत असलेले घरोब्याचे संबंध आपल्या सदिच्छा अभिप्रायात मांडलेत. सरपटवारांचा आरंभीचा काळा खूप हलाखीचा होता. तरीदेखील त्यांच्या आत्मिक समृद्धी आणि संपन्नतेची दखल राधा मंगेशकर यांनी घेतली. सरपटवारांनी या पुस्तिकेतून जो काळ उभा केला तो वास्तवतेचं दर्शन घडवतो, असंही त्यांनी आग्रहानं सांगितलं.
भूतकाळातून वर्तमानात आणि वर्तमानातून भविष्याकडं प्रवास करणारा प्रवासी असेही गौरवोद्गार त्यांनी सरपटवारांसाठी काढलेत. या पुस्तिकेत पहिलाच लेख त्यांच्या आईवर आहे. त्या बराच काळ आजारी होत्या. सरपटवारांचे वडील गेले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. त्यामुळे त्यांनी आधीच पैशांची जुळवा जुळव करून ठेवली होती.
जवळपास एक महिना त्यांनी मृत्यूशी संघर्ष केला. आजीची प्रकृती पाहून शैलेश आणि शिल्पा या दोन्ही नातवंडांची परिस्थिती बिकट झाली होती. प्राचार्य राम शेवाळकर खाण्याच्या बाबतीतही प्रचंड रसिक होते. त्यांना त्या नियमित विविध पदार्थ करून पाठवीत असत. एवढंच नव्हे तर गदिमा, पु. भा. भावे, सोपानदेव चौधरी, गं. त्र्यं. माडखोलकर, बाळशास्त्री हरदास आदी अनेक मान्यवरांनी त्यांच्या हातच्या जेवणाचा आस्वाद घेतला. त्या जुन्या संस्कारातल्या होत्या.
सोवळं-ओवळं, जात-पात त्या पाळत मात्र प्रेमाच्या पातळीवर त्या कधीच भेदभाव करत नसत. म्हणूनच वामन ठाकरे आणि रसूल खान यांच्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केलं. अत्यंत संवेदनशील समतोल साधून सरपटवारांनी त्यांच्या आईला वाचकांसमोर प्रस्तुत केलं. गंगाधरराव हे लेखकांचे वडील. त्यांना ते बाबाजी म्हणत. धार्मिक वृत्तीचे बाबाजी बहुतांश वेळ पूजाअर्चेत घालवत. नीळकंठ बाबा, ताजुद्दीन बाबा आदी अनेक संतांवर त्यांची विशेष श्रद्धा होती. त्यांचा वकिलीचा पेशा होता.
परंतु पुढं वणीच्या शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात आठवा वर्ग सुरू झाला. त्यांनी वकिली व्यवसाय सोडून शिक्षणक्षेत्रात शिक्षक म्हणून कार्य सुरू केलं. हलाखीची परिस्थिती, कर्ज असूनही त्यांन गुणवत्तेत कधीच तडजोड केली नाही.
त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. ती त्यांनी पुढील पिढीतदेखील रुजविली. त्यांचं चित्र उभं करताना लेखक भावूक झाल्याचं प्रकर्षानं जाणवतं. सोबतच वाचकही भावूक होतात. संत नीळकंठ बाबांच्या आठवणी खऱ्या अर्थानं लेखकाच्या वडलांच्याच. त्यांनी अत्यंत समर्थपणे शब्दबद्ध केल्यात. हे जबलपूरचे संत. त्यांच्या अनेक आठवणी लेखकाच्या वडलांनी जपल्यात. त्या लेखकानं शब्द्धबद्ध केल्यात. नीळकंठबाबांची सर्वाभूती भगवंत ही भूमिका आपल्याला या लेखातून स्पष्ट जाणवते. बाबांकडून मिळालेल्या अनेक अनुभवांची शिदोरी शब्दांत बांधण्यात लेखक यशस्वी झालेत. लेखक स्वतः साहित्यिक आणि साहित्यप्रेमी आहेत.
त्यामुळं त्यांच्याच परिवारातील कवी ना. मा. सरपटवार यांची नोंद केल्याशिवाय ही पुस्तिका पूर्णच होऊ शकली नसती. आयुष्याच्या अखेरपर्यंत ना. मा. यांचं लेखन आणि वाचन सुरूच होतं. नियतीचे अनेक आघात त्यांन सहन केलेत. लीलया ते पचवलेत. त्यांचा ‘पदाती’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. हा देववेडा आणि माणूसवेडा संवेदनशील हृदयाचा कवी वयाच्या 86व्या वर्षी अनंततात विलीन झाला. देवीस्तोत्र समतुल्य ‘वात्सल्यसिंधू आई-आशादेवी’ हा लेख म्हणजे वैश्विक आईचाच गौरव आहे. आशा उपाख्य देवी खानझोडे ह्या लेखकाच्या मामी तथा सासू. त्यामुळं ही नात्याची वीण अधिकच घट्ट असल्याचं लेख वाचताना जाणवतं. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपल्या घरी ठेवून घेतलं.
त्यांच्यावर सर्वोत्तम संस्कार केलेत. अनेक विद्यार्थी घडवलेत. त्याही उत्तम कवयित्री आणि प्रतिभासंपन्न व्यक्ती होत्या.
लेखाकाच्या बहिणीचे यजमान म्हणजे रमेश कुऱ्हेकर अमरावतीचे. या मातृहृदयी व्यक्तिमत्त्वाचं शब्दचित्र रेखाटताना शब्द वाचकांशी बोलायला लागतात. शिक्षण क्षेत्रात यशस्वी आणि विद्यार्थीप्रिय म्हणूनच त्यांची ओळख होती. ते स्टेट बॅंकेत नोकरीला होते. अत्यंत व्यस्तता तर कायमचीच. तरीदेखील ऑफीस आणि परिवाराची जबाबदारी त्यांनी चोखपणे सांभाळली. त्यात कुठंच सरमिसळ होऊ दिली नाही. हा भावस्पर्शी लेख नकळतच वाचकांच्या पापण्यांच्या कडा ओल्या करतो.
लेखकाची मोठी बहीण मालुताई ढुमे काही वर्षाांपूर्वी निवर्तल्यात. त्या लेखकापेक्षा वयानं 2-3 वर्षांनी मोठ्या. अर्थात समवयस्कच. त्यामुळं त्यांच्यावर भाष्य करताना लेखक आपल्या बालपणात रमतात. किंबहुना वाचकांनाही त्या काळाचे साक्षीदार करतात. वणी जवळील कायर हे सरपटवारांचं मूळ गाव. या गावाशी जुळलेल्या आठवणीतून अस्सल मातीचा गंध हमखास दरवळतो. वक्ता दशसहस्रेशू प्राचार्य राम शेवाळकर म्हणजे सरपटवारांचं आराध्य दैवतच. या ज्ञानसूर्याच्या आणि प्रतिभावंतांच्या सोबतच्या जवळपास अर्ध्या शतकाच्या प्रवासाचं शब्दशिल्प उभारणं हे लेखकासाठी दिव्यच होतं.
तरीदेखील हे शिवधनुष्य सरपटवारांनी लीलया पेललं. प्राचार्य राम शेवाळकरांची वक्ता, लेखक, निरुपणकार अशी ओळख तर सर्वांनाच माहीत आहे. म्हणून लेखकानं त्यावर खूप सविस्तर भाष्य केलं नाही.
अनेकांना माहीत नसलेच्या या हिमनगाच्या तळापर्यंत नेण्याचा प्रयत्न ‘ऐसी कळवळ्याची जाती’ या लेखातून त्यांनी केली. हेच पुस्तिकेचं शीर्षक असणं हा केवळ इत्तेफाक नाही. जगद्गुरू तुकोबाराय आणि विल्यम वर्डस्वर्थ म्हणतात त्याचप्रमाण हा ‘अंतरीचे ते धावे स्वभावे बाहेर’ असा हा प्रवास आहे. शेवाळकरांच्या खाण्यापिण्याच्या आवडींपासून त्यांच्या अनेक पैलूंवर लेखकानं समर्थपणे प्रकाश टाकला. त्यांचं खाणं, गाणं, नक्कल, निखळ विनोद, कुटुंबवात्सल्य, आदरातिथ, निटनेटकेपणा, वक्तशीरपणा, अशा अनेक इतरांना माहीत नसलेल्या सद्गुणांवर लेखकानं प्रकाश टाकला. त्यांची राष्टभक्ती, महामानव आणि क्रांतिकारकांवर असलेली प्रेम व निष्ठा या लेखातून वाचकांना जाणवते. त्यांचा हात सुटल्याचं शल्य लेखकाला अजूनही बोचत असल्याचं शल्य हा लेख वाचताना जाणवतं.
लेखकाच्या आयुष्यात अनेक जिव्हाळ्याची माणसं आलीत. अनेक तांत्रिक कारणांमुळं सगळ्यांचीच दखल घेणं शक्य झालं नाही. तरीदेखील सर्व प्रकरणांच्या अखेरीस ‘लाभावीण प्रीती’ करणारे गणपत पाटील, एस. पी. एम. शाळेचे शिक्षक वामनराव ठाकरे, कवी आणि संपादक कृष्णाजी लाडसे, स्वातत्र्य संग्राम सैनिक नानाजी भागवत, शिक्षक म. ता. राजुरकर यांच्याप्रती ते छायाचित्रांस कृतज्ञता व्यक्त करतात. ही पुस्तिका म्हणजे सरपटवार यांचा फ्लॅशबॅकच आहे. अनेक तिखट, गोड, आंबट, कडू अशा आठवणींची मेजवानीच आहे. हे ‘अंतरीचं’ सगळं ‘स्वभावे’ बाहेरी आलेलं आहे.
कोणत्यात शब्दाला किंवा वाक्याला कुठंच ओढून ताणून बसवलेलं नाही. एका परिवाराची मैफल रंगावी तशीच ही शब्दांची मैफल रंगली. मुखपृष्ठही अत्यंत साधं आणि सरळ. केवळ लेखांची शीर्षकं. ओघवती वाणीतून सहज संवाद साधावा तशीच ही पुस्तिका आपल्या वाचकांशी बोलते. 12 जानेवारीला वणीतील नगर वाचनालयात या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला. लगेच 14 जानेवारीला सरपटवारांच्या एका कौटुंबिक सोहळ्यात या पुस्तिकेचं लोकापर्ण झालं. आपल्या आप्तांना कसं प्रस्तुत करावं याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. वाचक नक्कीच या पुस्तिकेचं स्वागत करतील. सदिच्छा.

Comments are closed.