अनलॉक होताच तिस-या लाटेसाठी वणीकरांकडून स्वागत…!

बाजारपेठेत एकच गर्दी, मास्क, सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

0

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनापासून काहीसा दिलासा मिळाल्यानंतर सोमवार 7 जून पासून जिल्ह्यातील सर्व निर्बंध मागे घेण्यात आले. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडल्याने शहरातील रस्त्यांवर सकाळ पासूनच मोठी गर्दी झाली. बाजारपेठेत खरेदीसाठी वर्दळ वाढली तर रस्त्यांवर वाहनांची कोंडी देखील झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर, दुकानात, बँकेमध्ये, व कार्यालयांमध्ये कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडविल्याने ही तिस-या लाटेचे स्वागत तर नाही असे चित्र आज शहरात दिसून आले.

वणी येथील कापड, सराफा, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, जनरल, मोबाईल, ऑटोमोबाईल, दुरुस्ती, सलून, ब्युटीपार्लर दुकाने सकाळ पासूनच उघडली. त्यामुळे शहरातील गांधी चौक, शाम टॉकीज परिसर, भाजी मंडी, महाराष्ट्र बँक चौक, टिळक चौक, यवतमाळ रोड या भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली. एकुणच बाजार अनलॉक झाल्यापाठोपाठ नागरिकांचे कोरोनाप्रती गांभीर्यही ‘अनलॉक’ झाल्याचा प्रत्यय सोमवारी दिसून आला.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात गेल्या दीड ते दोन महिन्यापासून अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना बंद होत्या. मात्र राज्य शासनाने टप्या टप्यात निर्बंध मागे घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांहून कमी तसेच ऑक्सीजन बेडचा वापर 25 टक्क्यांपेक्षा ही कमी आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात लॉकडाउन उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खुले ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या सवलतीचा शहरवासीयांना गैरफायदा घेतला असल्याचे दिसून आले. जर असेच राहिले तर तिसरी लाट येण्यास वेळ लागणार नाही.

हे देखील वाचा:

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

 

Leave A Reply

Your email address will not be published.