बहुगुणी डेस्क, वणी: दुचाकी दुरुस्तीसाठी दिली की महत्त्वाचे कामं थांबतात. त्यामुळे अनेकदा कामासाठी गॅरेज चालकाची दुचाकी मागितली जाते. गॅरेज चालकही नेहमीच्या ओळखीच्या ग्राहकांना मदत म्हणून त्याची दुचाकी ग्राहकांना देतो. मात्र मदत म्हणून ग्राहकाला दुचाकी देणे गॅरेज चालकाला चांगलेच महागात पडले. ग्राहकांने दुचाकीच्या पेट्रोल टंकीचे झाकण तर हरवले. मात्र गॅरेज चालकाला पैसे मागितल्यावर त्याला मारहाण देखील केली. मारेगाव तालुक्यातील शिबला (पालगाव) येथे ही घटन घडली.
नितेश शेषराव नागोसे हा शिबला ता. मारेगाव येथील रहिवासी असून त्याचे बोटोणी (पालगाव) येथे गॅरेज आहे. गुरुवारी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी त्याच्या दुकानात गावातच राहणारा गजानन सोमाजी सोयाम (27) हा दुचाकी दुरुस्ती करण्यासाठी आला. त्याला मुलाला घरी सोडायचे होते. त्यामुळे त्याने नितेशला दुचाकी मागितली. नितेशने त्याला दुचाकी दिली. काम झाल्यानंतर गजाननने दुचाकी परत केली. मात्र तेव्हा दुचाकीच्या पेट्रोल टाकीला झाकण नव्हते.
दुचाकीचे झाकण कुठे पडले ते शोधून आण किंवा झाकणाचे पैसे दे अशी मागणी नितेशने गजानन जवळ केली. त्यावर गजाननने संध्याकाळी घरी येऊन पैसे घेऊन जा असे सांगितले. संध्याकाळी 6 वाजताच्या नितेश हा जनावरे घरी आणण्यासाठी काठी घेऊन जात होता. त्यावेळी गावातील चौकात नितेशला गजानन दिसला. त्याने गजानन जवळ पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने घरून पैसे आणून देतो असे सांगत तो घरी गेला.
मात्र थोड्या वेळाने तो परत आला व पैसे देत नाही जे करायचे ते कर अशी धमकी त्याने नितेशला दिली. त्याने तिथेच नितेशशी वाद घालायला सुरुवात केली. गजाननने नितेशच्या हातातील काठी हिसकावून त्याला मारहाण केली. मारहाणीमुळे नितेश चक्कर येऊन पडला. तर गजानन घटनास्थळावरून पसार झाला. गावातील व्यक्तींनी नितेशच्या वडिलांना तो जखमी असल्याची माहिती दिली. गावातील सहका-याच्या मदतीने त्याला ऑटोत बसवून मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.
उपचारानंतर नितेशने मारेगाव पोलीस ठाणे गाठत आरोपी गजानन विरोधात तक्रारी दिली. पोलिसांनी गजानन विरोधात बीएनएसच्या कलम 118(1), 352 नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
Comments are closed.