भरधाव ट्रकची दुचाकीला कट, अपघातात दुचाकीचालक जखमी

अपघातानंतर घटनास्थळी ट्रक सोडून चालक फरार

बहुगुणी डेस्क, वणी: भरधाव ट्रकने एका दुचाकी चालकाला कट मारली. त्यामुळे दुचाकीचालकाचा तोल जाऊन ते खाली पडले. या अपघातात लक्ष्मण मलन्ना काळे हे जखमी झाले. लिंगटी जवळ पाटण रोडवर ही घटना घडली. घटनेनंतर ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला. लक्ष्मण यांच्या मुलाच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण मलन्ना काळे (60) हे लिंगटी ता. झरी येथील रहिवासी असून त्यांचे पाटण रोडवर पवन एजन्सी नावाने दुकान आहे. रविवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून दुचाकीने घरी परतत होते. तेव्हा मुकुटबन कडून पाटणकडे भरधाव जाणा-या ट्रकने (TS-01 -UC-2461) लक्ष्मण यांच्या दुचाकीला कट मारली. यात दुचाकीला ट्रकचे टायर लागले व दुचाकीचालक खाली पडले. यात ते जखमी झाले. त्यांच्या मानेला व डोक्याला मार लागला.

दुचाकी चालक खाली पडल्याने ट्रकचालकाने ट्रक थांबवला. दरम्यान तिथे गावातीलच भुमारेड्डी पाटकुरवार होते. ते लक्ष्मण यांच्या जवळ आले व त्यांनी लक्ष्मण यांना उचलले. दरम्यान ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. भुमारेड्डी यांनी गावातील काही लोकांना घटनास्थळी बोलवले. लक्ष्मण यांना अदिलाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

लक्ष्मण यांच्या मुलाच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरोधात बीएनएसच्या कलम 125(a), 281 व मोटारवाहन कायद्याच्या कलम 134(A), 134(B) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पाटण पोलीस करीत आहे. 

Comments are closed.