मुख्यमंत्री होण्यापूर्वी “ते” वणी, माजरीला विकायचे किरकोळ सामान….
स्वातंत्र्यसैनिक, खेळाडू, पत्रकार, टी.सी., साहित्यिक ते मुख्यमंत्री असा राहिला 'त्यांचा' थक्क करणारा प्रवास
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते, गल्ल्या झाडत होते. दादरला हे दृष्य पाहण्यासाठी बघ्यांचीही गर्दी झाली होती. अनेकांना ही स्टंटबाजी वाटली. वर्तमानपत्रांनी, व्यंगचित्रकारांनीदेखील टर उडवली.
पण तो एका दिवसाचा देखावा मुळीच नव्हता. मुंबईतल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. तेव्हा महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री दादासाहेब उपाख्य मारोतराव सांबशिपंत कन्नमवार यांनी स्वतः हे धाडसी पाऊल उचललं. शेवटी स्वच्छता कामगारांना संकोच वाटला. त्यांनी संप मागे घेतला.
मुख्यमंत्री म्हणून जवळपास एकच वर्षाचा त्यांचा कार्यकाळ राहिला. पदावर असतानाच त्यांचं निधन झालं. दादासाहेब कन्नमवार गरिबीतून, सामान्य कुटुंबातून वर आलेले होते. ते अखेरपर्यंत सामान्यांसोबतच सामान्यांसारखेच राहिलेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला आर्थिक संकटांचा सामना करावा लागला.
मुख्यमंत्रीपद भूषवूनही त्यांनी कधी कोणती ‘माया’ जमविली नाही. जमविलीत ती फक्त माणसं. लोकांचा विश्वास. लोकांचं प्रेम. 10 जानेवारी 1900 हा त्यांचा जन्मदिवस. मागील दशकांत त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचं कष्टही कोणी घेतलं नाही.
त्यांची जयंती आणि स्मृतिदिन व्हावा यासाठी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती महाराष्ट्रच्या वतीने, विविध संस्था आणि संघटन आंदोलन करीत आहेत. असे गजानन चंदावार यांनी सांगितले. नुकतेच त्यासाठी ईमेल आंदोलनही झाले. त्यांचा जीवनप्रवास आणि कार्यकाळ विलक्षणच राहिला.
चंद्रपूर जिल्ह्यातील मुलजवळील मारोडा हे मारोतराव कन्नमवार यांचं मूळ गाव. त्यांचे पूर्वज जुन्या आंध्रप्रदेशातील कन्नम या गावाचे म्हणून ते कन्नमवार आडनाव मिळालं असं म्हणतात. त्यांचे आजोबा बेलदार म्हणजे घरं बांधणारे.
नंतर ते चंद्रपूरला आलेत आणि तिथेच स्थायिक झालेत. मारोतरावांचे आजोबा राजप्पाजी व्यंकोबाजी कन्नमवार दुकानदार होते. वडील सांबसदाशिव चंद्रपूर नगरपालिकेत कारकून होते. नंतर ऑक्ट्राॅय सुपिरिटेंडेंट झालेत.
मारोतराव उपाख्य दादासाहेब यांचा जन्म 10 जानेवारी 1900मध्ये चंद्रपूरला झाला. सांबशिवपंत, गंगाबाई हे त्यांचे आईवडील. जनाबाई, गोविंद, मारोती, रुक्मिणी ही त्यांची अपत्यं. त्यात मारोतराव तिसरे. ते चंद्रपूरच्या भानापेठेत राहत.
जुबली हायस्कूलमध्ये त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं. शालेय जीवनातच त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाचे बीजारोपण कळत नकळतच झालं. दिनांक 15 फेब्रुवारी 1918ला बाळ गंगाधर टिळक चंद्रपूरला येणार होते. तेव्हा मारोतराव शिकतच होते.
विद्यार्थ्यांनी यात सहभागी होऊ नये असा आदेश निघाला होता. विद्यार्थ्यांच्या सह्या घेतल्या गेल्यात. लहानग्या मारोतीला टिळकांना पाहण्याची, ऐकण्याची खूप इच्छा होती. म्हणून त्याने सही केली नाही. काही सवंगड्यांसह रामाळा तलावावर सभा घेतली. कसंही करून ते टिळकांचं भाषण ऐकायला गेलेतच. त्यांच्या भाषणाने ते चांगलेच प्रभावित झालेत.
वाचनाची आवड त्यांना होतीच. लायब्ररीत बसून ते बरंच काही वाचत. तेव्हा तिथे अनेकांच्या चर्चा ऐकायला मिळत. गांधी विचारांची पेरणीदेखील तिथूनच व्हायला लागली. हळूहळू त्यांचं गांधीप्रेम वाढलं. देशभक्ती आणि स्वातंत्र्याच्या ध्येयाने त्यांना झपाटलं.
अगदी कमी वयातच त्यांच्या राजकीय जीवनाला आरंभ झाला. तेव्हा देशभरात स्वातंत्र्यलढ्याचे वारे वाहत होते. तारुण्यात येता येता मारोतराव कन्नमवार यांच्यावर गांधीविचारांचा प्रभाव वाढत गेला. त्यात ते वयाच्या 18 व्या वर्षातच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उतरलेत.
महात्मा गांधींच्या विचारांच्या पे्ररेणतूनच त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ते सक्रिय राहिलेत. त्यासाठी अनेकदा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. थोडं आर्थिक स्थैर्य लाभावं म्हणून त्यांनी 16 डिसेंबर 1924 ला डिस्ट्रिक्ट कौंसिलमध्ये नोकरी केली.
तरीदेखील त्यांचं स्वातंत्र्य चळवळीतलं काम सुरूच होतं. 11 मार्च 1930ला गांधीजींचं दांडी आंदोलन देशव्यापी झालं. भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्य चळवळीनं पेटून उठलेत. ठिकठिकाणी विविध आंदोलनं व्हायला लागलीत. चंद्रपूर परिसरातील या आंदोलनांचं नियोजन मारोतरावांनी केलं.
आपल्या मुलाने म्हणजेच मारोतरावांनी सर्वांसारखी नोकरी धंदा करावा. प्रपंच करावा अशी त्यांच्या वडलांची स्वाभाविक इच्छा होती. मुलाने हे सगळं सोडून ते स्वातंत्र्य चळवळीत उतरणं वडलांना आवडत नव्हतं. मारोतरावांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
कापूस, धान्य, किराणा हेदेखील व्यवसाय करून बघितलेत. दरम्यान ते आपला माल विकण्यासाठी वणी, माजरी अशा परिसरातील गावांतदेखील जायचेत. एकदा तर मुंबईलाच गेलेत. तिथे रेल्वेत तिकीट तपासणीस म्हणून काम करायला लागलेत.
साथीच्या आजारामुळे त्यांना तिथून परत यावं लागलं. काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात काम करत. अत्यंत कठीण संघर्षात त्यांचं बालपण गेलं. जीवनातला एकेक नवा अनुभव ते घेत राहिलेत.
हाॅकी आणि क्रिकेट खेळण्याचा त्यांना छंद होता. शालेय जीवनात त्यांचा इतिहासचा चांगला अभ्यास होता. परिश्रम आणि कष्टाचे संस्कार त्यांना लहानपणापासूनच मिळालेत. मारोतराव आईला लाकडं, गोवऱ्या वेचण्यास मदत करीत.
वडलांनाही बांधकामात मदत करीत. एकदा कामावर असताना ते पडलेत. डोक्याला मार लागला. कष्टाची सवय लहानपणापासूनच होती. त्यामुळे अंगमेहनतीतही ते कधीच मागे पडत नव्हते. ते मुख्यमंत्री असताना एकदा गडचिरोली जिल्ह्यातील एका खेड्यात त्यांना शाळेच्या इमारतीच्या लोकार्पणासाठी जायचं होतं.
गडचिरोलीत त्यांचा मुक्काम होता. पावसामुळे त्या गावापर्यंत जाणारे रस्ते चिखलाने खराब झालेत. तिथपर्यंत गाड्या नेणं अशक्य होतं. शेवटी त्या 13 ते 14 किलोमीटर दूर असलेल्या गावात ते पायीच चिखल तुडवीत निघालेत. त्यांची वाट पाहणारे असंख्य चाहते तिथे होते. त्यांना निराष करायला नको, म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला होता.
संपादक सुरेश द्वादशीवार एका लेखात त्यांच्या वक्तृत्वशैलीचं वर्णन करतात. मारोतराव कन्नमवार हे उत्तम आणि प्रभावी वक्ते होते. प्रत्येक विषयाचा ते सखोल अभ्यास करायचे. पूर्वतयारी करायचे. शहरांपासून खेड्यापाड्यातही त्यांची भाषणे गाजायची.
सरळसाधी लोकांना कळणाारी त्यांची भाषा होती. श्रोत्यांच्याच दैनंदिन जीवनातले अनुभव आणि किस्से ते सांगत. तेव्हा लाउडस्पीकर परवडणारे नव्हते. त्यामुळे ते अगदी मोठ्या आवाजात भाषण देत. बोलता बोलता ते कधी श्रोत्यांमध्ये जात कळतही नव्हतं.
त्यांचं भाषण म्हणजे थेट संवादच राहायचा. हळूहळू त्यांच्या कार्यामुळे त्यांचं विदर्भातल्या काँग्रेसमध्ये वर्चस्व वाढतच राहिलं. 1952मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूल सावली मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत. त्यांनी दळणवळण, सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्यखातीदेखील सांभाळलीत. तेव्हाच्या मध्यप्रांतातही त्यांनी बराच काळ आरोग्य खाते सांभाळले.
चिनचं भारतासोबत युद्ध पेटलं. तेव्हा संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी यशवंतराव चव्हाणांवर आली. तेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर कन्नमवार उपमुख्यमंत्री. यशवंतरावांच्या मुख्यमंत्री होण्यामागेदेखील कन्नमवार यांचा सिंहाचा वाटा होता. 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 हा त्यांचा कार्यकाळ. पदावर असतानाचा त्यांचं निधन झालं.
महाराष्ट्राचे ते दुसरे मुख्यमंत्री होते. एवढं असलं तरी त्यांची जमिनीशी नाळ कधीच तुटली नाही. त्यांचा जेव्हा चंद्रपूरला दौरा असायचा, तेव्हा तुफान गर्दी व्हायची. त्यांना भेटायला अनेक लोक यायचे. त्यांच्यासोबत अगदी कौटुंबिक, पर्सनल विषयदेखील शेअर करायचेत. सर्वसामान्यांच्या समस्या ते अत्यंत गांभीर्याने जाणून घेत. त्यावर तोडगाही काढत, मग ती राजकीय असो वा कौटुंबिक.
मुख्यंमंत्रीपदाचा त्यांचा कार्यकाळ अत्यल्प असाच होता. त्यातही त्यांनी अनेक भरीव कामं केलीत. प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी जिल्हा रुग्णालय सुरू केले, असे संपादक मधुकर भावे एका भाषणात म्हणालेत. ओझरचा मीग विमान कारखाना, वरणगाव, भंडारा आणि भद्रावतीचे संरक्षण साहित्य उत्पादन कारखाने त्यांच्या पे्ररणेतून अथवा पुढाकारातून झालेत.
विदर्भात साखर कारखाना त्यांनी सुरू केला. चिनचे भारतावर आक्रमण झाले. दादासाहेब कन्नमवार यांनी संरक्षण निधीसाठी रेडिओवरून आवाहन केलं. 26 नोव्हेंबर 1962ला त्यांनी निधी संकलनासाठी प्रभातफेरी काढली. एकेका ट्रकमध्ये लता मंगेशकर, दिलीप कुमार, अशोक कुमार, मोतीलाल, राजकपूरपासून अनेक सेलिब्रेटीज होत्या.
पहिल्या ट्रकमध्ये साक्षात कन्नमवार होते. हे लोकांना मदतीचे आवाहन करीत होते. त्यांनी मुख्यमंत्री संघाविरूद्ध महापौर संघ क्रिकेट सामना आयोजित केला. त्यातूनही बराच निधी गोळा झाला. विशेष म्हणजे या क्रिकेट मॅचमध्ये ते स्वतः बॅट घेऊन वयाची साठी उलटल्यावरही खेळलेतदेखील. चंद्रपूरवासीयांनी त्यांनी सुवर्णतुला करून ते सोने देशाला अर्पण केले. त्या काळात त्यांनी जनसामान्यातून संरक्षण निधीसाठी जवळपास 8 कोटींची रक्कम उभी केली.
‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे दादासाहेब कन्नमवारांच्याही बाबतीत घडलं. अनेक वर्तमानपत्रांनी त्यांच्याविरोधात लेखनही केलं होतं. अगदी आचार्य अत्रे यांचं ‘मराठा’ हे पत्रदेखील त्यातून सुटलं नाही. तरीदेखील दादासाहेब कन्नमवार त्यांना पुरून उरलेत.
ते माणूस म्हणून नेहमीच श्रेष्ठच राहिलेत. राजकारणी, नेता म्हणूनही ते जनसामान्यांचा आधार आणि विश्वास होते. ते स्वातंत्र्यसैनिक होते. पत्रकार, खेळाडू, वक्ते आणि साहित्यिकदेखील होते. त्यांनी महात्मा गांधींवर काही पुस्तकं लिहिलीत. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘राजमाता जिजाबाई’ हे पुस्तक लिहिलं. 17 जून 1963ला त्याचं प्रकाशन सिंदखेड राजा येथे झालं. एवढंच नव्हे तर त्यांनी जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात केली.
त्यांना इंग्रजी येत नाही असा अपप्रचारही त्याकाळात करण्यात आला होता. मात्र त्यांनी इंग्रजीतही विपुल लेखन केलं. भाषणंही दिलीत. ‘गांधी अॅण्ड चिल्डेन’ हे पुस्तक त्यांनी इंग्रजीतच लिहिलं होतं. त्यांनी एक साप्ताहिकही काढलं होतं. त्यात ते नियमित लेखन करायचे.
समाजाच्या, देशाच्या प्रश्नांना वाचा फोडायचे. मुख्यमंत्रीपदावर राहूनदेखील ते सामान्य जीवनच जगलेत. गांधी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. गांधी विचार ते आयुष्यभर जगलेत. राहण्यातली, वागण्या-बोलण्यातली सहजता त्यांनी नेहमीच जोपासली.
‘आम’ आदमी त्यांच्यासाठी नेहमीच ‘खास’ होता. त्यांच्यावर नंतरच्या काळात बरंच लेखन झालं. त्यांच्या निधनानंतर काहीच काळात तु. ना. काटकर यांनी त्यांच्यावर पुस्तकदेखील काढलं. त्यांच्यावर पी.एच.डी.साठी संशोधनही झालं.
संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या ‘तारांगण’ या पुस्तकात दादासाहेब कन्नमवार यांच्यावर एक स्वतंत्र प्रकरण आहे. संपादक मधुकर भावे यांनी त्यांच्या आठवणी न्यू मीडियावर सांगितल्यात. ते म्हणालेत की कन्नमवार यांना विदर्भाबद्दल कमालीचा जिव्हाळा होता.
विदर्भाचा विकास व्हावा यासाठी त्यांची धडपड होती. त्यांचा लोकसंग्रही प्रचंड मोठा होता. त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली. तेव्हा सर्वप्रथम त्यांनी कोकण रेल्वेचा ठराव मांडला. तेव्हा बाबू जगजीवनराम हे तेव्हा रेल्वेमंत्री होते.
मारोतराव हे कट्टर विदर्भवादी होते. त्यांचं विदर्भात वजनही होतं. फाजल अली कमिशन लागू झालं असतं तर ते स्वतंत्र विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री झाले असते. विदर्भाचे महान रत्न होते मारोतराव उपाख्य दादासाहेब कन्नमवार. त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
हेदेखील वाचा
बनावट तंबाखू व सुपारी व्यावसायिकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी
हेदेखील वाचा