गोविंदा आला रे… ! वणीत पहिल्यांदाच रंगणार दहीहंडीचा थरार

जितेंद्र कोठारी, वणी: कृष्ण जन्माष्टमी पासून संपूर्ण राज्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. मोठ्या शहरांसोबतच आता ग्रामीण भागातही दहीहंडी फोडण्याची प्रथा सुरू झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वणी येथे पहिल्यांदा भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय मैदानावर 11 सप्टेंबर रोजी दहीहंडीचा थरार वणीकर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेंती प्राजक्ता माळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दहीहंडी उत्सवासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत मनसे नेते राजू उंबरकर यांनी याबाबत मीडियाला माहिती दिली.

दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, परतवाडा आणि इतर ठिकाणहून 15 गोविंदा पथक वणी येथे येणार आहे. हंडी फोडणाऱ्या विजयी गोविंदा मंडळावर बक्षीसांची लयलूट होणार आहे. मुख्य दहीहंडी जमिनीपासून 41 फूट उंचीवर बांधण्यात येणार आहे. दुसरी हंडी 35 फुटावर, तिसरी हंडी 30 फुटावर बांधण्यात येणार आहे.

सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजे पर्यंत या दहीहंडीचा थरार नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. मनसे सिनेमा सेलची पदाधिकारी व सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी या दही हंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण राहणार आहे.

दहीहंडी कार्यक्रमासाठी उत्कृष्ठ व अद्यावत साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिशय रोमांचक आणि रोमहर्षक असलेल्या या कार्यक्रमात पहिला बक्षीस 2 लाख 51 हजार, द्वितीय बक्षीस 1 लाख रुपये आणि तिसरा विजेता बक्षीस 51 हजार रुपये प्रदान करण्यात येणार आहे.

या उत्सवासाठी 15 टीम चे तब्बल 3 हजार सदस्य येणार आहे. त्यांची सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फक्त 30 सेकंदमध्ये दहीहंडी फोडण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न या उत्सवात केला जाणार आहे. महिलांसाठी या उत्सवात विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच या चालू वर्षामध्ये मनसे तर्फे विविध क्रीडा उपक्रम राबवले जाणार आहे. अशी माहिती राजू उंबरकर यांनी दिली.

हे देखील वाचा:

आकर्षक देखावे, वाद्यांच्या तालावर आणि भाविकांच्या जल्लोषात निघाली भव्य शोभायात्रा

Comments are closed.