सिमेंट कंपनीच्या स्फोटांमुळे शेतक-याचे नुकसान

बोअरवेल खचली, शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीद्वारा केल्या जाणा-या स्फोटांमुळे एका शेतकऱ्याच्या शेतातील बोअरवेल खचली आहे. परिणामी शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय त्यामुळे पिकांना पाणी देणंही बंद झालं आहे. संबंधित शेतकऱ्याने कंपनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याने नुकसान भरपाईसाठी आता जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

झरी तालुक्यातील मुकुटबन येथील शेतकरी संजय यशवंत आसुटकर यांचे पिंप्रडवाडी शिवारात (गट क्रमांक ५३/१) 3 एकर शेत आहे. पिकांना जलसिंचन करण्यासाठी शेतात कूपनलिका आहे. बोअरवेलला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने खरीप आणि रब्बी पिकांसह उन्हाळी पिकांची लागवड केली जाते.

यावर्षी सदर शेतात सोयाबीन पिकांची लागवड केली आहे. सदर शेतातील भाऊबंदकितील काही शेतजमीन कंपनीने प्रकल्पाकरीता खरेदी केली आहे. संजय आसुटकर यांच्या शेतालगत सिमेंट कंपनीने कच्च्या मालाचे उत्खनन सुरू केले आहे. उत्खनना दरम्यान प्रचंड प्रमाणात अनियंत्रित स्फोट घडवून आणण्याच्या कामाला कंपनीने नुकतीच सुरुवात केली आहे.

गत आठवड्यात कंपनी द्वारे उत्खननासाठी केलेल्या स्फोटा दरम्यान प्रचंड कंपन होऊन शेतातील कूपनलिका खचली. कुपनलिकेच्या जवळ पाच फूट खोल खड्डा पडला आहे. बोअरवेल निकामी झाल्याने भविष्यात पिकांना पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्फोटांमुळे उडालेले दगड शेतात पडतात. विजेचे खांब कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतात येणाऱ्या दगडांमुळे किंवा अकस्मात खांब कोसळल्यास शेतात काम करणाऱ्यांच्या जीवाला धोका संभवतो. कच्या मालाची वाहतूक करण्यासाठी तयार केलेला रस्ता सदर शेतालगत असल्याने प्रचंड प्रमाणात धूळ पिकांवर साचते.

सदर शेतकऱ्याचा उदरनिर्वाह केवळ शेतीवरच अवलंबून आहे. मात्र कंपनीचे अधिकारी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे संबंधित हताश शेतकऱ्याने योग्य न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.