दारू पिऊन झिंगली काय यंत्रणा? आरोपींचं काय!

दारू जप्त होऊनही आरोपींवर कारवाई न झाल्याने सरपंचाचा उपोषणाचा इशारा.

0 277

सुशील ओझा, झरी : देशी दारू जप्तीप्रकरणात पोलिसांची कारवाई महिना उलटूनही शून्य आहे.  ही यंत्रणाच झिंगली की काय असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे सरपंच नितीन गोरे यांनी दारू विक्रेत्यावर गुन्हे दाखल करून परवाना रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

झरी तालुक्यातील मांगली येथील परवानाधारक देशी दारू दुकानातून आलिशान वाहनाने दारूची वाहतूक होत असल्याची माहिती सरपंच गोरे यांना काही दिवसांपूर्वी मिळाली होती. १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान सरपंच गोरे हे नाना बद्रे यांना घेऊन झरी जात असताना गावाजवळील रेल्वे गेटजवळ आलिशान चारचाकी क्र. एम एच ३४ एए ९६९१ आली.

सदर गाडीत देशी दारूच्या पेट्या असल्याची शंका आल्याने चारचाकी थांबवली व पाहणी केली असता, देशी दारूच्या १५ पेट्या आढळून आल्या. यावेळी चालक आणि मालक पसार झाले. दारू पकडल्याची माहिती मुकुटबन पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यावरून एएसआय शशिकांत नागरगोजे घटनास्थळी पोहोचले. दारू जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आली. सरपंच नितीन गोरे यांनी अबकारी विभागाचे निरीक्षक केडीया यांनासुद्धा फोन करून पोलीस स्टेशनला बोलाविले. याबाबतची तक्रार त्यांना दिली. तसेच दारू एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री होत असल्याचेही सांगितले. .

मात्र, अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई न झाल्याने पोलिसांवर संशय व्यक्त करीत त्यांनी तक्रार दिली आहे. त्वरित गुन्हे दाखल करून परवाना रद्द न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा गोरे यांनी दिला आहे..

Comments
Loading...