‘वणी, मारेगाव झरी तालुक्यात ओला दु्ष्काळ जाहीर करा’

शेतकऱ्यांना प्रति एकर 25 हजारांच्या मदतीची आमदारांची मागणी

0

विवेक तोटेवार, वणी: परतीच्या पावसाने परिसरातील शेतक-यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस साठी प्रति एकर सरासरी 25 हजार रुपये शासनाने मदत द्यावी अशी मागणी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे. याबाबत मंगळवारी 20 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिका-यांना त्यांनी निवेदन दिले आहे.

मारेगाव तालुक्यातील सराटी, मेंढणी, खंडणी, हटवांजरी, बुरांडा या गावात कृषी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमदारांनी शेतीची पाहणी केली. तिथे परिस्थिती विदारक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हिच परिस्थिती वणी विधानसभा क्षेत्रात येणा-या तिन्ही तालुक्याची आहे. त्यामुळे वणी, झरी व मारेगाव या तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणीही आमदारांनी निवेदनातून केली आहे.

निवेदना म्हटले आहे की सप्टेंबर महिन्यातील पावसाने व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे सोयाबीन जमीनदोस्त झाले आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनचे दाणे सडले आहे. अशावेळी एकरी 2 ते 3 क्विंटल सोयाबीन निघणेही शक्य नाही. शिवाय निघालेल्या उत्पन्नाला 1000 ते 1500 रुपये भाव देखील मिळण्याची शक्यता नाही.

सोयाबीन पेक्षाही वाईट परिस्थिती कापसाची आहे. वादळी पावसाने शेतातील कापसाची झाडे मोडून पडली आहे. तर पावसाने कापसाचे बोंड सडले आहे. याचा परिणाम कापसाचा दर्जा व उत्पन्न दोघांवरही होणार. या असमानी संकटामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. यावेळी शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी ही शासनाचे कर्तव्य आहे.

पिक आणेवारी काढत असताना प्रचलित पद्धतीचा वापर करून आणेवारी काढली जाते. परंतु या पद्धतीत गुणवत्तेचा कुठेही अंतर्भाव केल्या जात नाही. प्रचलित पद्धतीत उत्पन्नाची मोजणी केली जाते. परंतु पावसामुळे उत्पन्नाचा दर्जा खालावून भावात निम्म पेक्षाही घट होते. याचा विचार केला जात नाही. त्यामुळे आणेवारी करताना याचाही विचार करणे गरजेचे आहे. अशीही मागणी निवेदनातून केली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.