अखेर शनिवारपासून वणीतील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल होणार सुरू

लोढा हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना घेता येणार उपचार

0

जब्बार चीनी, वणी: वणीतील लोढा हॉस्पिटलला जिल्हाधिकारी यांनी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल घोषीत केले होते. त्यानुसार सामान्य हॉस्पिटलला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. अखेर हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले असून शनिवारी दिनांक 26 सप्टेंबरपासून परिसरातील कोविड रुग्णांना इथे उपचार घेता येणार आहे. इथे 50 बे़डचे अत्याधुनिक व सर्व सेवा सुविधायुक्त कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये पॉजिटिव्ह रुग्णांना सामान्य उपचारापासून ते शस्त्रक्रियेपर्यंत सर्व सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. याआधी पॉजिटिव्ह असणारे किंवा गंभीर रुग्ण अत्यावश्यक सेवांसाठी नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ येथे धाव घेत होते. मात्र आता शहरातच शासनाने दिलेल्या दरानुसार मल्टिस्पेशालिटी सेवा मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांची परवड थांबणार आहे. दरम्यान तेली फैल येथे कोविड हॉस्पिटल सुरू झाल्याने येथील लोढा हॉस्पिटल हे सत्यसेवा हॉस्पिटल येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

Podar School 2025

जिह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यू लक्षात घेऊन 13 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील 7 हॉस्पिटलला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) घोषीत केले होते. वणीतील लोढा हॉस्पिटलचा देखील यात समावेश होता. जिल्हाधिकारी यांनी हॉस्पिटलला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) करण्यासाठी 18 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र संचालकांनी ती मुदत वाढवून 25 सप्टेबरपर्यंत केली होती. अखेर शनिवार पासून इथे कोरोना रुग्णांना भरती होता येणार असून त्यांच्यावर तिथे मल्टिस्पेशालिटी उपचार मिळणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) आणि सामान्य रुग्णालयातील फरक
सध्या प्रत्येक तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटरची (सीसीसी) स्थापना करण्यात आली आहे. वणी तालुक्याचे सीसीसी हे परसोडा येथे आहे. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नाही शिवाय तिथे उपचारही होत नाही. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या व मृत्यू लक्षात घेऊन, तसेच रुग्णांना वेळेत स्थानिक ठिकाणीच उपचार मिळावे यासाठी जिल्हाप्रशासनाने काही रुग्णालयाला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल घोषित केले. यात वणीतील लोढा हॉस्पिटलचा समावेश आहे. डीसीएचमध्ये फक्त कोरोना रुग्णांवरच उपचार केला जातो. पॉजिटिव्ह नसलेले इतर आजारांवरचे रुग्ण तिथे दाखल केले जात नाही.

अपघात झाला किंवा महिलेची प्रसुती असेल तर…
उदा. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला, एखाद्या महिलेची प्रसूती आहे किंवा कुणाला अचानक  हृदयविकाराचा धक्का आला, अशा कोणत्याही गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापुर्वी त्या रुग्णाची आधी कोविड टेस्ट केली जाते. जर ती टेस्ट निगेटिव्ह आली तरच त्या रुग्णांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. सध्या अपघात झालेली व्यक्ती, प्रसुती किंवा इतर कोणतेही गंभीर आजाराचे रुग्ण हे उपचाराआधी पॉजिटिव्ह आले तर अशा रुग्णांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना सध्या यवतमाळ, चंद्रपूर किंवा नागपूर येथे हलवण्याशिवाय पर्याय नाही. या प्रक्रियेत बराच वेळ जातो. केवळ उपचारासाठी उशिर झाल्यानेही रुग्णांना जीव गमवावा लागण्याची शक्यता असते.

लोढा हॉस्पिटल हे तालुक्यातील नव्हे तर परिसरातील एकमेव डीसीएस आहे. इथे सामान्य कोरोना रुग्ण, पॉजिटिव्ह गर्भवती स्त्रीची प्रसुती, पॉजिटिव्ह असलेल्या व्यक्तींचे ऑपरेशन, कोरोनाबाधित बाळ इ रुग्णांवर उपचार केला जाणार आहे. शिवाय कोरोना टेस्ट, सीटीस्कॅन, आयसीयू इत्यादी सेवा सुविधा देखील दिल्या जाणार आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळणार असल्याने त्याचा तालुक्यासह मारेगाव, झरी तालुक्यातील रुग्णांना देखील फायदा होऊ शकतो. सध्या कोरोनाचे गंभीर रुग्ण नागपूर, चंद्रपूर, सेवाग्राम, यवतमाळ इत्यादी ठिकाणी जाऊन उपचार घेत आहे. यात वेळ खर्च होत आहे. खासगी रुग्णालयात बेड न मिळाल्यास रुग्णांची परवड देखील होत आहे. त्यामुळे तालुक्यातील एकमेव डेडिकेटेड हॉस्पिटलमुळे परिसरातील कोरोना रुग्णांना चांगलाच दिलासा मिळू शकतो.

आमचे मनोधैर्य खचू देऊ नका: डॉ. महेंद्र लोढा
या महामारीशी आपल्याला मिळून लढायचे आहे. मी, माझे डॉक्टर, नर्स, कम्पॉउंटर, सहायक, स्विपर, फार्मसिस्ट इत्यादी सर्वच कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करणार आहे. त्यामुळे आमचे मनोधैर्य कुठेही खचू देऊ नका. काही लोक हॉस्पिटलबाबत गैरसमज पसरवत आहे. हॉस्पिटलमधले उपचार घेणारे पॉजिटिव्ह लोक खिडकीतून बाहेर थुंकून कोरोना पसरवणार अशी भिती दाखवली जात आहे. यात काहीही तथ्य नाही. कोरोना रुग्ण हा पूर्णपणे आयसोलेट असतो. रुग्ण असलेली खोली पूर्ण बंद असते. तो बरा होत पर्यंत त्याचा बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क होत नाही. कोविड हॉस्पिटलमुळे कोणत्याही शेजा-यांना कोरोना झाल्याचे उदाहरण जगात नाही. उलट  गंभीर झालेल्या अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. कोविड रुग्णालय हे नागरिकांचा जीव घेण्यासाठी नाही तर जीव वाचवण्यासाठी आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी भिती बाळगू नये व सहकार्य करावे.
– डॉ, महेंद्र लोढा, संचालक, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल

लोढा हॉस्पिटलची सेवा आता सत्यसेवा हॉस्पिटलमध्ये
तेली फैल येथील लोढा हॉस्पिटल येथे डेडिकेटेड कोवि़ड हॉस्पिटल तयार करण्यात आले असल्याने इथले हॉस्पिटल सत्यसेवा हॉस्पिटल झेड पी कॉलनी यवतमाळ रोड येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. आधीच्या हॉस्पिटलच्या सर्व सेवा सुविधा आता सामान्य रुग्णांना सत्यसेवा हॉस्पिटल येथे मिळणार आहे. यात प्रसुती, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, ऑपरेशन, आयसीयू, ओपीडी इत्यादी सेवा सुविधा राहणार आहे. तरी सामान्य रुग्णांनी (पॉजिटिव्ह नसलेल्या) आता आरोग्य सेवेसाठी सत्यसेवा हॉस्पिटल येथे संपर्क साधावा असे आवाहन लोढा हॉस्पिटलतर्फे करण्यात आली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.