मॅक्रून स्कुल व्हॅन अपघात प्रकरणी आरोपींना शिक्षा
◆ 18 फेब्रु. 2016 ला झाली होती भीषण दुर्घटना
जितेंद्र कोठारी, वणी: चार वर्षांपूर्वी घडलेल्या मॅक्रून स्कुलव्हॅन अपघात प्रकरणी आज बुधवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी कोर्टाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे. यात व्हॅन चालकास 5 वर्ष व स्कूलव्हॅनला धडक देणा-या ट्रक चालकाला 2 वर्षाच्या कारागृहाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालय केळापूर येथे आज या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. यात न्यायमूर्ती पी. बी. नाईकवाड यांनी हा निकाल दिला. या अपघातात 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता तर 5 विद्यार्थी जखमी झाले होते.
वणी शहरालगत वडगाव रोडवर मॅक्रून स्टुडन्ट अकादमी ही सीबीएसई शाळा आहे. दि. 18 फेब्रु. 2016 रोजी टाटा मॅजिक व्हॅन (MH 34- AA 7738) चा चालक गणेश बोधने रा. वणी हा वणी शहरातून 9 विद्यार्थ्यांना घेऊन सकाळी 7 वाजताच्या दरम्यान शाळेकरिता निघाला होता. नांदेपेरा रोड बायपास चौफुलीच्या काही मीटर अंतरावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळसा भरलेल्या एका ट्रकने स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली.
अपघातात 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 5 विद्यार्थी जखमी
या भीषण अपघातात मॅक्रून शाळेतील दोन विद्यार्थी गौरव हिरामण देऊलकर (15) व कु. श्रद्धा प्रदीप हुलके (14) वर्ष या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी कु. श्रेया रवींद्र उलमाले (12) आणि कु. दिशा राजू काकडे (12) यांचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघातात कु. श्रुतिका संजय ढोके, हर्षद मनोज इंगोले, श्रेयस प्रदीप हुलके, कु. वैष्णवी भाऊराव मत्ते, निशांत यादव देऊलकर आणि कु. विशाखा तेलंग हे विद्यार्थी जखमी झाले होते. अपघातात व्हॅन चालक गणेश गुलाब बोधने हा सुद्दा जखमी झाला होता.
तत्कालीन ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांनी स्कूल व्हॅनला धडक देणारा ट्रक (MH34- M 1133) चा चालक नियाज अहेमद सिद्दीकी, घुग्गुस याला ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्द भादंवि कलम 304 (अ), 279, 337, 338, 134 व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.
घटनेच्या तब्बल साडेचार वर्षानंतर पांढरकवडा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी स्कूलव्हॅन चालक आरोपी गणेश गुलाब बोधने, रा. तैलीफेल वणी यास निष्काळजीपणे वाहन चालवून 4 निष्पाप चिमुकल्यांच्या मृत्यूस कारणीभूत धरून त्यांना 5 वर्ष कारागृहाची शिक्षा सुनावली. तर वाहतूक नियम मोडून विरुद्द दिशेने वाहन चालवून स्कूल व्हॅनला धडक दिल्याचे दोषी ठरवून ट्रक चालक नियाज अहमद सिद्दीकी, रा. घुग्गुस, जि. चंद्रपूर यास 2 वर्ष कारावासची शिक्षा दिली.
ऍड विनायक काकडे विशेष सरकारी वकील
पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर मृत विद्यार्थ्यांचे पालक आणि वणी येथील नागरिकांनी पीडित कुटुंबाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून वणी येथील नामवंत विधिज्ञ ऍड. विनायक काकडे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घडलेल्या घटनेची भीषणता लक्षात आणून पालकांच्या मनातील इच्छा लक्षात आणून दिली. तेव्हा शासनाने ऍड. विनायक काकडे यांना विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणाची बाजू मांडण्याची संधी दिली. आज आरोपींना शिक्षा मिळाल्याने मृतकांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
तपास अधिकारी तत्कालीन ठाणेदार पो. नि. मुकुंद कुळकर्णी यांनी आरोपींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला होता. निर्धारित कालावधीत तपास पूर्ण करून सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. विशेष म्हणजे पो. नि. मुकुंद कुळकर्णी यांनी शिरपूर आणि वणी पो.स्टे. येथे पदस्थ असताना दाखल केलेले सर्व गुन्ह्यामध्ये आरोपींना न्यायालयातून शिक्षा देण्यात आलेली आहे.
(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)