पीओपी मूर्ती विक्रीविरोधात कार्यवाही करण्याची मागणी

मूर्तीकार संघटनेचे एसडीओंना निवेदन, शासनाने बंद आणली असतानाही कार्यवाही का नाही?

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आगामी काळात श्री गणेश उत्सव सण मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमीत्त वणी शहरातील सर्व व्यावसायिक मूर्तीकारांनी पर्यावरण पुरक मातीच्या मूर्त्या बणविण्याचा एकमताने निर्णय घेतला होता. परंतु काही व्यवसायिक लोकांनी बाहेरून प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्ती वणी शहरात विक्रीसाठी आणल्या आहेत. त्याची विक्रीही वणी शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशा मूर्तीकाराविरोधात तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी मूर्तीकार संघटनेने केली आहे. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेत याबाबत निवेदन सादर केले.

वणी शहर व परिसरातील मूर्तिकार प्रामुख्याने मातीच्या मूर्ती घडविणारे आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या दिशा निर्देशा नुसार पीओपी मूर्ती उत्पादनच्या विक्री आणि साठवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात सर्व कारवाई करण्याचे हक्क स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे. सध्या शहरात राजरोसपणे पीओपी मूर्तीची विक्री होत असतानाही प्रशासनातर्फे अद्यापही कोणती कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे मूर्तीकार संघटने तर्फे संताप व्यक्त केला जात आहे.

पीओपी मूर्ती बाबत कारवाई न केल्यास कठोर आंदोलन करण्याचा इशारा मूर्तिकार संघटने तर्फे देण्यात आला आहे. निवेदन सादर करते वेळी अध्यक्ष सुधाकर बुरडकर, उपाध्यक्ष नत्थु डुकरे, रवींद्र पाटाळकर, सुहास झिलपे, कमलाकर झिलपे, गंगाधर खंडारे, प्रभू मत्ते, मनीष बुरडकर यांच्यासह शहरातील मूर्तीकार उपस्थित होते. जर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास मोठे आंदोलन केले जाईल असा इशाराही मूर्तीकार संघटनेद्वारा देण्यात आला आहे. 

गेल्या वर्षी मोठे आंदोलन
गेल्या वर्षी शहरात पीओपीच्या मूर्त्यांची सर्रास विक्री होत असल्याने मूर्तीकार संघटनेने संताप व्यक्त करत मोठे आंदोलन केले होते. त्यांनी पाण्याच्या टाकीजवळ पालिकेच्या पथकासमोर जोरदार घोषणाबाजी करत तहसिल कार्यालयावर मोर्चा नेला होता. गेल्या वर्षीचा अनुभव असतानाही प्रशासन पीओपी मूर्ती विरोधात कोणतीही कार्यवाही करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.