‘घरकुलाचे हप्ते न दिल्यास नगरपंचायतीच्या इमारतीत घुसून राहू’
झरी येथील ३५ घरकुल धारकांचे नगरपंचायतीला निवेदन
सुशील ओझा, वणी: नगरपंचायत अंतर्गत झरी येथील 35 लोकांना एका वर्षांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर करण्यात आले. आवास योजनेचे घरबांधकामाची परवानगी सुद्धा नगरपंचायत तर्फे देण्यात आली. योजनेचे घरकुल बांधकाम बहुतांश लोकांनी सुरू केले. मात्र शासनाकडून अनुदानाचा दुसरा व तिसरा हप्ता न मिळाल्याने लाभार्थ्यांना छप्पर नसलेल्या घरातच संसार करावा लागत आहे. याबाबत अनेकदा निवेदन देण्यात आले होते. मात्र जर येत्या 15 दिवसांच्या आत प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता न मिळाल्यास नगरपंचायतीच्या नवीन इमारतीमध्ये येऊन राहणार असा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
पंतप्रधान आवाज योजने अंतर्गत झरी येथील 35 लाभार्थ्यांना बांधकामाचा पहिला टप्पा 40 हजार देण्यात आला. त्यात घरकुल लाभार्थी यांनी स्लॅब लेवल पर्यंत बांधकाम केले. परंतु शासनाकडून दुसरा व तिसरा हप्ता न मिळाल्याने घराचे स्लॅब पडले नाही. ज्यामुळे अनेक लाभार्थ्यांना छपराविना घरात राहावे लागत आहे. तर घराला छप्परच नसल्याने काही लाभार्थी भाड्याच्या घरात राहत आहे.
पावसाळा सुरू असल्यामुळे उघड्यावर राहणाऱ्या लाभार्थीचे साप, विंचू इतर जलचर प्राण्यामुळे कुटुंबासह लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर लॉकडाऊन मुळे गोरगरीब जनतेजवळ काम नसल्याने घराचे भाडे देणे कठीण झाले आहे. त्यामुळे एकतर रोजगार नाही, राहायला घर नाही, घराचे भाडे आणि त्यात शासनाने रोखलेले अनुदान यामुळे करावे काय अशा मनस्थितीत हे लाभार्थी आहेत.
घरकुल लाभार्थ्यांनी दुसरा हप्ता मिळावा या करिता उपोषण केले होते. उपोषण दरम्यान सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले गेले होते. परंतु ते अजूनही पूर्ण केले गेले नाही. झरी नागरपंच्यात अंतर्गत वॉर्ड क्र १७ मध्ये ९ घरकुल ४ मध्ये ३,५ मध्ये २, १६ मध्ये ४,१३ मध्ये २ व १२ मध्ये ३ घरकुल मंजूर असून हे सर्व लाभार्थी बांधकामाचा दुसरा हप्ता न मिळाल्याने त्रस्त झाले आहे.
घरकुल लाभार्थी यांनी ३ मे २०१९ व २९ मे २०२० ला जिल्हाधिकारी व नगरपंचायतचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना तक्रार देऊनही कोणताच उपयोग होत नसल्याची ओरड लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
आता मात्र लाभार्थ्यांनी कठोर भूमिका घेत हफ्ता न मिळाल्यास नगर पंचायतीच्या इमारतीत जाऊन राहण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदन देते वेळी मारोती वेट्टी, कुसुम गेडाम, हनमंतु पस्तुलवार, सचिन कोडापे, विलास कोंडावार, दिलीप मैरवार, कमल येरेवार, रज्जूबाई कुळमेथे, गंगुबाई मिरलवार, नागेश्वर सोयाम, पिंटू सोळंकी, मारोती वाढई, शकुंतला ताडुरवार, रामदास मांडवकर, शारदा गोसुलवार, कुंडलिक मांडवकर, परशुराम जुमनाके व केवलदास कोडपे उपस्थित होते.