वणी तालुक्यात होणारे अवैध उत्खनन थांबवण्याची मागणी
संभाजी ब्रिगेडची मागणी, 8 दिवसांचा अल्टिमेटम अन्यथा आंदोलन....
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात ठिकठिकाणी मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्याची अवैध विक्री करणारे रॅकेट सज्ज आहे. हा गोरखधंदा मागील काही वर्षापासून राजरोसपणे सुरु आहे. यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीची हानी होत आहे. तसेच सरकारला मिळणारा महसूल बुडत आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड तर्फे करण्यात आली. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की वागदरा (नविन), मोहदा, रासा, वांजरी इत्यादी ठिकाणी मुरुमाचे सर्रास उत्खनन सुरु आहे. याबाबत संबंधीत विभागाकडे परिसरातील नागरिकांनी तसेच संभाजी ब्रिगेडने अनेकदा तक्रार केली. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. यावर योग्य ती कार्यवाही होत नसल्याने नैसर्गिक टेकड्या पोखरल्या जात आहे.
जेसीबी मशीनने परमीशन नसतांना सुद्धा ५० फुट खोली पर्यंत उत्खनन केले जात आहे. या सर्व प्रकाराला महसुल, आर.टी.ओ., वाहतुक व पोलीस प्रशासनाचा मोठा वरदहस्त लाभला आहे. यामुळे संबधीत विभागात कोणी लेखी किंवा मौखिक तक्रार केल्यास तात्पुरती कार्यवाही करून हजारो ब्रास अवैद्य मुरूमाचे उत्खनन आढळून आल्यास थोडे फार उत्खनन केल्याची नोंद केली जाते.
वागदरा येथे जप्त केलेला जेसीबी सोडला
तालुक्यातील नवीन वागदरा येथे 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास नैसर्गिक टेकडीवर मुरूम खोदून काढणारा जेसीबी महसूल विभागाने जप्त केला होता. तीन दिवस सरकारी सुट्टी असल्याने मंगळवारी या जेसीबी चालक व मालकावर महसूल प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अवैध उत्खनन होत नसल्याचा अहवाल दिला. सदर अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर जप्त केलेला जेसीबी सोडण्यात आला.
या सर्व प्रकाराला पाठबळ देणाऱ्या संबंधीत विभागातील अधिकारी व कर्मचा-यांवर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा येत्या 8 दिवसात या तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाअध्यक्ष अजय धोबे, ऍड अमोल टोंगे, खालीलभाई शेख, दत्ता दोहे, आशिष रिंगोले व इतर नागरिक उपस्थित होते.
Comments are closed.