बहुगुणी डेस्क, वणी: शेतकरी नेते व सामाजिक कार्यकर्ते देवराव धांडे यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर देवराव धांडे यांची प्रकृती गंभीर आहे. आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ब्राह्मणी फाट्याजवळ एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यांच्या पत्नीचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला. अपघाताची माहिती मिळताच अनेक शेतकरी व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले. देवराव धांडे यांच्या हात व पायाला दुखापत झाली असली, तरी सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवराव धांडे (अंदाजे 73) हे मुळचे वारगाव येथील रहिवासी असून ते वणीतील आशीर्वाद हॉटेल मागील चर्चजवळ त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. ते त्यांची पत्नी मालन धांडे ( अंदाजे 65) यांच्यासह त्यांची स्प्लेडर या दुचाकीने वारगावला गेले होते. आज सोमवारी दिनांक 5 मे रोजी संध्याकाळी उन्ह कमी झाल्यावर ते वारगावहून वणीला परतत होते. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ब्राह्मणी कडून एक ट्रक रेल्वे सायडिंगकडे जात होता. दरम्यान याच वेळी देवराव धांडे हे टोलनाक्याच्या दिशेने जात होते. ब्राह्मणी फाट्याजवळ वळण घेत असताना ट्रकची धांडे यांच्या दुचाकीला जबर धडक बसली. ट्रकने धांडे यांच्या पत्नीला चिरडले. यात यांच्या अंगावरून ट्रकचे डाव्या बाजूचे समोरील चाक गेले.
त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर देवराव धांडे यांच्या हात व पायावरून ट्रकचे चाक गेले. धडक दिल्यानंतर ट्रक टोल नाक्याजवळ जाऊन थांबला. अपघात होताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. देवराव धांडे हे सुपरिचित असल्याने लोकांनी याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. ऍम्ब्युलन्सला बोलावण्यात आले. तर घटनास्थळावरील एका दुचाकीस्वाराने त्यांना पाठीमागे बसवून वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच धांडे यांची मुलगी, जावई, परिचित व्यक्ती घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मालन यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक क्षेत्रात कार्यरत अनेक लोकांनी रुग्णालयात धाव घेतली. सध्या देवराव धांडे यांची प्रकृती स्थीर आहे. मालन यांचा मृतदेह उत्तरिय तपासणी साठी पाठवण्यात आला आहे. मालन यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. देवराव धांडे हे परिसरात एक शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते व नेते आहे. धांडे पाटील म्हणून ते ओळखले जातात. शेतकरी व सामाजिक चळवळीत ते गेल्या 4 ते 5 दशकांपासून सक्रिय आहेत. (बातमी ही प्राथमिक माहितीवर असून अधिकची माहिती येताच बातमी अपडेट केली जाईल.)
Comments are closed.