सुरेन्द्र इखारे, वणी: येथील धनगर युवा मोर्चाच्या वतीने दिनांक 9 जानेवारी 2019 ला तहसीलदार धनमने यांना राज्यशासन मेगाभरती मधील कृषी सेवक पदाच्या १४१६ जागांना स्थगिती देण्याबाबत निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या अखत्यारीतील कृषी विभागाच्या कृषी सेवक पदाच्या रिक्त असलेल्या १४१६ काढण्यात आलेल्या जागांपैकी केवळ १४ जागा भज-क प्रवर्गाला देण्यात आल्या आहे.
भज-क प्रवर्गाला ३.५ टक्के आरक्षण आहे. त्यानुसार ४० जागा भज-क प्रवर्गाला राखीव हव्यात. मग हे ३.५ टक्के आरक्षण गेलं कुठे. हा धनगर समाजावर अन्याय आहे. असा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे.
जो पर्यंत समाजाला आरक्षण नुसार जागा देण्यात येत नाही. तो पर्यंत कुठलीही भरती प्रक्रिया चालू करु नये. अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे. यावेळी धनगर युवा मोर्चाचे संस्थापक अनिकेत चामाटे, प्रज्वल ढाले, गौरव ताटकोंडावर, साई नालमवार व समस्त धनगर युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.