न. प. शाळा क्र. 1 मध्ये डिजिटल कक्षाचे उद्घाटन
देवेंद्र खरवडे, शैक्षणिक प्रतिनिधी वणी: नगर परिषद वणी अंतर्गत असलेल्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 1 येथे दि. 17 एप्रिल रोजी डिजिटल कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माता पालक मेळावाही घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती आरती वांढरे होत्या तर उद्घाटक म्हणून नगरसेवक पांडुरंग टोंगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, धनराज भोंगळे, उषा बुरडकर हे होते,
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक शंकर आत्राम म्हणाले की सर्व शिक्षक व पालकांच्या सहकार्याने हा डिजिटल कक्ष उभारण्यात आला आहे. प्रशासन अधिकारी चवरे यांनी डिजिटल कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार व परिणामकारक अध्यापन करता येणार असल्याचे सांगितले. प्रमुख अतिथी धनराज भोंगळे यांनी मुख्याध्यापक शंकर आत्राम यांच्या प्रशासन कौशल्याचे व शाळेत राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. उद्घाटक पांडुरंग यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिक्षण सभापती आरती वांढरे यांनी शाळेची पटसंख्या 40 वरुन 240 पर्यंत वाढविल्या बद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन रवी तोंडे यांनी केले तर आभार एकनाथ लांबट यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा धानोरकर ,मीना थोरात, सुनिता जकाते, दिगांबर ठाकरे, काकासाहेब जायभाये व केशव चकोर यांनी परिश्रम घेतले.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…