दीपक चौपाटी ते जंगली पीर रस्ता सुधारणेच्या प्रतीक्षेत

प्रशासन दाखवत आहे एकमेकांकडे बोट

0

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरातून भालर, गडचांदूर, कोरपना या ठिकाणी जाणार मुख्य मार्ग हा दीपक चौपाटीवरूनच जातो. परंतु मागील 7 ते 8 वर्षांपासून हा मार्ग बनविण्यात न आल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने खड्डा किती खोल आहे याचा अंदाज चालकाला घेता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार सत्तेत असताना त्यांनी आमदार निधीतून सदर मार्ग तयार केला होता. त्यानंतर मात्र या रस्त्याचा कुणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता कुणाच्या अधिकार क्षेत्रात येतो याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद व ग्रामपंचायत यांच्यात एकमेकांकडे बोट दाखविण्यात स्पर्धा सुरू आहे.

या रस्त्याबाबत कित्येकदा निवेदन, अर्ज, विनंत्या देण्यात आल्या. यावर नगर परिषदेकडून रस्त्यावरचे खड्डे थातुरमातुर बुजविण्यात आले. परंतु अवघ्या पंधरा दिवसात पुन्हा खड्डे उघडे पडले. या ठिकाणाहून वाहन घेऊन जाणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रभाग क्रमांक 13 मधून जाणार नगरसेवक याच मार्गाने दररोज या जा करतो.

शहरातून एमआयडीसी, भालर, आयटीआय येथे जाणारे नागरिक व विद्यार्थीही याच मार्गावरून जातात. अत्यंत वरदळ असणारा हा मार्ग आता सुधारणेच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे. कित्येकदा सुजाण नागरिकांकडून याबाबत सत्ताधार्यांना माहितीही पुरविण्यात आली. परंतु कुंभकर्णी झोपेत असलेल्या व सत्तेचा माज आलेले सत्ताधारी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.