वणीत आजपासून तांदळासोबत मोफत डाळ वाटप

गरीबांच्या ताटात आता भातासोबत वरणही दिसणार...

0

जब्बार चीनी, वणी: कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत गहू व तांदूळापाठोपाठ आता डाळही मोफत देण्यात येणार आहे. शनिवार पासन या वाटपाला सुरूवात होणार आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रती शिधापत्रिका महिन्याला एक किलो डाळ दिली जाणार आहे. शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना प्रतिमहिना प्रत्येकी लाभार्थ्यांना पाच किलो मोफत तांदूळ आधीच मिळात होते. त्यात आता डाळीचाही समावेश झाला आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये गरिबांच्या ताटात आता भातासोबत वरणही येणार आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीसाठीच लाभार्थ्याना प्रतिशिधापत्रिका प्रतिमाह एक किलो डाळ मोफत दिली जाणार आहे. यामध्ये तूर डाळ व चणा डाळ या दोन्हीपैकी एक डाळ एक किलो राहणार आहे. वणी तालुक्यात डाळीचे वितरण करण्यासाठी मे महिन्यासाठी 255 क्विंटल चणा दाळ मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार सध्या जिल्हानिहाय शिधापत्रिकांच्या संख्येनुसार तूर डाळ व चणा डाळीचे महिन्याचा पुरवठा करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

डाळी नाफेडकडून 50 कि.ग्रॅ.च्या बॅगमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. सध्या डाळी महागल्या आहेत. दरम्यान, पुरवठा विभागाकडून डाळी मोफत देण्याचे नियोजन गोरगरीब लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी केवळ तांदळाचे वाटप होत असल्याने शिधापत्रिकाधारकांकडून केवळ तांदूळच खायचा का असा प्रश्न विचारला जात होता.

ई-पास व्दारे होणार वितरण
या डाळीचे वितरण करताना रास्तभाव दुकानदारांनी ई पासव्दारे डाळी वितरीत करण्यास बंधनकारक आहे. रास्त भाव दुकानामधून वितरीत करण्यात येणा-या या डाळीची उचल करण्याबाबत संबंधित अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोणताही गरजू वंचित राहू नये – शाम धनमने
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीयअन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) तसेच एपीएल (केशरी) शिधापात्रिकाधारक यापैकी एकही शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वचिंत राहणार नाही. याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सर्व दुकानदारांना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आता वणी शहर व तालुक्यात मोफत तांदूळ व डाळ वाटप करण्यात येत आहे. तसेच नवसंजीवनी योजने अंतर्गत 16 गावांना नियमीत वाटपही सुरू केले आहे.

– शाम धनमने, तहसिलदार वणी

Leave A Reply

Your email address will not be published.