कॉरेन्टाईन असलेल्या तरुणाची आत्महत्या

शाळेतून पळून जाऊन आत्महत्या, तीन दिवसांनी घटना उघडकीस

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील जि. प. शाळेत होम कॉरेन्टाईन असलेल्या तेवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तो अहमदनगर येथे कामाला होता. गेल्या आठवड्यात तो अहमदनगरहून गोंडबुरांडा येथे स्वगावी परतला होता. त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत कॉरेन्टाईन करण्यात आले होते. मात्र आज शनिवारी त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

रामु विठ्ठल आत्राम (23) हा अमहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील वेळू येथील एका कारखान्यात काम करत होता. 10 मेला तो  त्याचा मित्र हनुमान आत्राम व सुरेश आत्राम यांच्यासोबत पुण्यावरून शासनाने व्यवस्था करून दिलेल्या बसने यवमताळला आला होता. 11 मेला ते तिघेही पायीच मारेगावात पोहोचले. तिथे त्यांच्यी तपासणी करून या सर्वांना आरोग्य विभागाने गोंडबुरांडा येथील जि. प. शाळेत कॉरेन्टाईन केले होते.

नजर चुकवून काढला पळ….
14 मे रोजी गुरूवारी सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास त्याने  दोन्ही मित्रांना शौचाला जाण्याचे कारण देऊन तो रूममधून बाहेर निघाला. त्यानंतर त्याने तिथे असलेल्या कर्मचा-याची नजर चुकवून शाळेच्या भिंतीवरून उडी मारली व कॉरेन्टाईन सेंटरमधून निघून गेला. मित्रांना तो शौचालयात असल्याचे वाटल्याने त्यांनी सुरूवातील याकडे दुर्लक्ष केले. मात्र काही तासानंतर तो आला नसल्याने त्यानंतर त्यांनी याची माहिती तिथल्या कर्मचा-यांना दिली. त्यांनी जवळपास शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो कुठेही आढळून आला नाही. इथे कार्यरत असलेले तलाठी यांनी मारेगाव पोलीसात याबाबत माहिती दिली, मारेगाव पोलिस स्टेशनचे पो नि जगदिश मंडलवार यांनी मोबाईल लोकेशन वरून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचे लोकेशन शिवनाळा गावा जवळ ट्रॅप झाले.

पोलिसांनी त्याचा शिवनाळा दिशेने शोध घेतला असता त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर निघून गेल्याच्या तीन दिवसानंतर आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास एका गुराख्याला गोंडबुरांडा शिवारातील पाझर तलावाजवळ एका झाडाला फासी घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत आ़ढळल्याने त्याने शाळेतून पळून गेल्यानंतरच आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे.

लोकांनी दूर ठेवल्याने आत्महत्या?
आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. रामू तीन ते चार दिवसांपासून हॉरेन्टाईन होता. त्याच्या हातावर कॉरेन्टाईनचा शिक्का असल्याने त्याला कुणी भेटायला येत नव्हते. त्याला घरून डब्बा येत होता. तो अहमदनगरहून परत आल्यावर त्याची साधी कुणी चौकशीही केली नाही. त्यामुळे या मानसिकतेतून तर त्यांने आत्महत्या केली नसावी? असा अंदाज बांधला जात आहे.

रामूच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची पालनपोषणाची जबाबदारी रामूवरच होती. केवळ आठवडाभरापूर्वी गावी आलेल्या तरुणाने असे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.