6 जणांच्या मृत्यू प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांची वणीला भेट
मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन
जितेंद्र कोठारी, वणी: दारू न मिळाल्याने तलफ भागवण्यासाठी सॅनिटाईजर प्यायल्याने वणीतील 6 व्यक्तींचा मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी व शनिवारी पहाटे ही घटना घडली. यात तिघांचा ग्रामीण रुग्णालयात तर तिघांचा घरी मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज शनिवारी दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील व अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी वणी येथे दौरा केला. या दौ-यात त्यांनी मृत झालेल्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सात्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार, पोनि वैभव जाधव, पोऊनी गोपाल जाधव, आरोग्य अधिकारी डॉ भालचंद्र आवारी होते.
शुक्रवारी संध्याकाळी सुनील महादेव ढेंगळे (32) राहणार देशमुखवाडी वणी व्यवसाय मिस्त्रीकाम, दत्ता कवडू लांजेवार (57) हा तेली फैल वणी व्यवसाय मजुरी, राहुल उर्फ नुतन देवराव पाथ्रटकर (35) रा. तेली फैल वणी व्यवसाय मिस्त्रीकाम, संतोष उर्फ बालू सुखदेव मेहेर (35) रा. एकता नगर वणी व्यवसाय हमाली, गणेश उत्तम शेलार (45) राहणार जैताई नगर, वणी व्यवसाय फर्निचर काम, भारत प्रकाश रुईकर (38) राहणार जटाशंकर चौक वणी व्यवसाय ड्रायव्हर असे 6 मृतकांचे नाव आहेत.
यातील सुनील ढेंगळे, दत्ता लांजेवार, गणेश शेलार, भारत रुईकर यांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला तर संतोष मेहेर व राहुल पाथ्रटकर यांचा पहाटे मृत्यू झाला. य़ाशिवाय विजय बावणे राहणार जैताई नगर यांचा देखील सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाल्याची चर्चा शहरात होती. मात्र त्यांना हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यामुळे चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करतेवेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले.
या सहा मृतकांनी एकत्रच सॅनिटायझरचे सेवन केल्याचा संशय आहे. हे सर्व मजुरी करत होते. या सर्वांचा गृप होता व ते मिळूनच दारू प्यायचे तसेच बसस्थानकाच्या मागे असलेली काली बस्ती परिसर हा त्यांचा अड्डा असल्याचीही माहिती परिसरातील काही व्यक्तींनी दिली. लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना दारू मिळत नसल्याने त्यांनी सॅनिटायझर पिण्यास सुरूवात केली होती.
काल संध्याकाळपासून एकेकाची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. संध्याकाळी सुनील ढेंगळे व दत्ता लांजेवार, भारत रुईकर व गणेश शेलार यांचा एकापाठोपाठ मृत्यू झाला. भीतीने उर्वरित दोघे दवाखान्यात गेलेच नाही व घरीच त्यांचा मृत्यू झाला. गणेश शेलार यांच्या मृतदेह पोस्टमार्टम न करता कुटुंबीय घेऊन गेले. पोस्टमार्टम करणार नाही असे दवाखान्यात लिहून दिले होते. या घटनेमुळे संपूर्ण शहर धवळून निघाले आहे.
हे देखील वाचा: