नव-याला लागला बाहेरवालीचा नाद, बायकोसमोरच साधायचा फोनवरून संवाद

पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: पतीला बाहेरचीचा नाद लागला. त्याचा परिणाम पती पत्नीच्या नात्यावर पडला. पती दारू पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा व पत्नीला मारहाण करायचा. पतीचे बाहेरवालीसोबत संबंध इतके मोकळ्या पणाने सुरु झाले की तो पत्नीच्या समोरच बाहेरवालीशी मोबाईलवर कॉल लावत तासंतास गप्पा हाणायचा. सातत्याने होणारी मारहाण व मानसिक त्रास यामुळे पत्नीने माहेर गाठत पतिविरोधात तक्रार दिली. अखेर या प्रकरणी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, गीता (नाव बदललेले वय 25) ही वणी तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. 2019 मध्ये तिचे वरोरा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या गणेश (बदललेले नाव वय 35) या व्यक्तीशी रितिरिवाजाप्रमाणे लग्न झाले. लग्नानंतर गीताचे काही दिवस चांगले गेलेत. मात्र त्यानंतर गणेश हा दारु पिऊन घरी यायचा व पत्नीवर संशय घेत मारहाण करायचा. दरम्यान त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक फुल देखील उमलले. सध्या ही मुलगी 2 वर्षाची मुलगी आहे. मुलीच्या जन्मानंतर सर्व सुरळीत होईल असे गीताला वाटले. मात्र झाले उलटेच.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गणेशला बाहेरची हवा लागली. तो एक दुस-या स्त्री सोबत फोनवर तासंतास बोलत असायचा. पत्नीने गणेशला समजावून सांगितले. मात्र उलट तोच तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करायचा. अशातच 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी गणेशने पत्नीशी वाद घातला. त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलीला घरी ठेव व तू इथून निघून जा असे त्याने गीताला धमकावत घराबाहेर काढले.

गीताने सदर माहिती तिच्या भावाला फोन करून दिली. तिचा भाऊ घरी आला. त्याने बहिणीला व भाचीला माहेरी आणले. 15 दिवसांनी गणेश गीताच्या माहेरी आला. त्याने मुलीला घरी घेऊन जातो असे म्हणत गीताच्या माहेरी वाद घातला. सातत्याने होणा-या मानसिक व शारीरिक त्रासामुळे त्रस्त होऊन अखेर गीताने वणी पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात तक्रार दाखल केली. सदर प्रकरण पांढरकवडा येथील समुपदेशन केंद्रात गेले. मात्र तिथे पती पत्नीत कोणताही समेट झाला नाही. अखेर पत्नीच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी पतीविरोधात बीएनएसच्या कलम 351(2) 351(3) 352 85 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. 

 

Comments are closed.