आपण सततच्या ऍसिडिटीने त्रस्त आहात? वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉग

बहुगुणी डेस्क, वणी: वणी बहुगुणी या पोर्टलवर आरोग्य विषयक ब्लॉग सुरू झाला आहे. यात वणीतील सर्जन डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) हे विविध रोग, आजार आणि त्यावरचे उपाय यावर मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या भागात हायपर ऍसिडीटी हा आजार आणि त्यावरचे उपचार याबाबत संपूर्ण माहिती देणार आहेत.

आपण अनेकदा एखाद्याला खाण्यासाठी किंवा चहासाठी आग्रह करतो मात्र ते ऍसिडिटीचे कारण देऊन त्यास नकार देतात. एसिडिटी ही एक सर्वसामान्य समस्या आहे. जगभरातील अनेकांना याचा त्रास होतो. यावर उपाय म्हणून आपल्याला यावरची गोळी देखील आपल्याला माहिती असते. मेडिकलमध्ये जाऊन आपण ती गोळी विकत आणून घेतो. गोळी घेतली की आपल्याला बरे वाटते. किंवा ऍसिडिटी झाल्यास आपण अनेकदा घरगुती उपाय करतो. त्याने देखील आराम मिळतो. ऍसिडिटी एखाद्या वेळी होत असेल किंवा साधी असेल तर हे उपाय कामी येतात. मात्र जर वारंवरा ही समस्या उद्भवत असेल तर हे गंभीर आहे. त्याने इतर रोगांनाही आपसुकच आमंत्रण मिळते.

काय आहे ऍसिडिटी (आम्लपित्त)?
शरीररचना बघितली तर घशापासून खाली पोटा पर्यंत अन्ननलिका असते. आपण जे खातो ते अन्ननलिकेतून पोटात (जठर-Stomach) जाते. पोटात जेवण गेले की ते पचवण्यासाठी आपले जठर ऍसिडची मदत घेते. जठरामध्ये हे ऍसिड (हायड्रोक्लोरिक ऍसिड) आपोआप तयार होत असते. जेव्हा जठरात खाल्लेल्या अन्नासाठी गरजे पेक्षा अधिकचे ऍसिड तयार होते. तेव्हा अन्न आणि ऍसिडचा समतोल बिघडतो. त्यालाच आपण ऍसिडिटी झाली असे म्हणतो.

आणखी थोडे सविस्तर सांगायचे झाल्यास अन्ननलिका आणि जठर यांच्यामध्ये एक झडप (व्हॉल्व) असते. हा व्हॉल्व सायकलच्या टायर ट्यूबमध्ये असलेल्या व्हॉल्वसारखा काम करतो. म्हणजे जसं पम्पने मारलेली हवा आत जाते व व्हॉल्व बंद होतो त्यामुळे हवा बाहेर येत नाही. अगदी तसेच. तर  या व्हॉल्व मधून अन्ननलिकेतील अन्न जठरात जाते मात्र तिथून ते बाहेर येत नाही. मात्र अनेकदा ऍसिड जास्त तयार झाल्यास जठरातील हे अ‍ॅसिड (पित्त) व्हॉल्व सैल होऊन बाहेर येते व सहजरित्या अन्ननलिकेत जाते. या पित्ताचा अन्ननलिकेच्या भींतीवर प्रभाव पडतो. त्यामुळे अन्ननलिकेला सूज येते व रुग्णाला अ‍ॅसिडिटीचा प्रचंड त्रास होतो. याला वैद्यकीय भाषेत ‘गॅस्ट्रोइसोफेजीयल रीफ्लक्स डिसीज’ (GERD) म्हणतात.

सततच्या ऍसिडीटीचे दुष्परिणाम
अ‍ॅसिडिटी जास्त प्रमाणात, सतत आणि खूप दिवस होत राहिल्यास रुग्णाला अन्ननलिकेत, जठरात, लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात जखमा होतात, यालाच अल्सर म्हणतात. या रुग्णांना पचनसंस्थेच्या याच भागाचा कर्करोगदेखील होऊ शकतात. अन्ननलिकेचे तोंड आकुंचन पावते, अन्ननलिकेचा कॅन्सर, स्वरसंचाला (व्होकल कॉर्ड) सूज व जखम इत्यादी दुष्परिणाम हायपर ऍसिडीटीमुळे होते.

काय असतात याची लक्षणं?
छातीत किंवा पोटाच्या वरच्या भागात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, पोट फुगल्यासारखे होणे किंवा गच्च वाटणे, घशात अन्नाचे कण अडकणे, पोट दुखणे, अन्न किंवा पाणी गिळताना त्रास होणे, डोके दुखणे, रात्री झोपेत अचानक आंबट ढेकर येऊन ती नाकातोंडात जाणे, उलटी येणे, वजन कमी होणे, शौचात रक्त जाऊ शकते किंवा शौच नेहमीपेक्षा काळी येणे इत्यादी हायपर ऍसिडिटीची लक्षणं आहेत.

का होते ऍसिडिटी?
याल सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे चुकीची आणि बदललेली जीवनशैली मानली जाते. सततचे वा अति धूम्रपान किंवा मद्यपान, अतिशय तिखट मसालेदार अन्नाचे सेवन, चहा, कॉफी, कोला पेये, कार्बोनेटेड शीत पेये जास्त प्रमाणात घेणं, तंबाखू, खर्रा इत्यादींचे सेवन, ताणतणावपूर्ण जीवन, व्यायामाचा अभाव, दोन खाण्यांच्या मध्ये खूप वेळ उपाशी राहणे, अपुरी झोप, अरबट चरबट- फास्ट फूड खाणे याशिवाय गर्भवती स्त्रियांना चौथ्या-पाचव्या महिन्यानंतर असा त्रास होऊ शकतो. अॅस्पिरीन किंवा तत्सम वेदनाशामके, स्टिरॉइड्स अशी औषधे घेणं अशा एक ना अनेक कारणांनी पित्ताचा त्रास सुरू होतो.

(मूळव्याध म्हणजे काय? मुळव्याध कसा बरा होतो… वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉक)

हायपर ऍसिडिटीचे निदान कसे केले जाते?
अ‍ॅसिडिटी क्वचितच झालेली आणि साधी असेल तर ती घरगुती औषध घेऊन बरी होते. पण सतत अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल किंवा ती तीव्र स्वरूपाची असेल, तर सारखी औषधे घेण्यापेक्षा डॉक्टरांकडून आधी तपासून घेतलेले कधीही चांगले असते. अॅसिडिटीच्या आजाराचे निदान बहुतांशी रुग्णाच्या लक्षणांवरूनच होते. आजाराचे कारण आणि व्याप्ती समजण्यासाठी बेरियम एक्सरे (यात औषध पिण्यास देऊन एक्स रे काढला जातो. यात अन्ननलिकेत कुठे अडथळा असल्यास त्याचे निदान होते.) एंडोस्कोपी/गॅस्ट्रोस्कोपी (यात मायक्रो कॅमेरा असलेली नळी रुग्णाच्या तोंडाद्वारे आत सरकवली जाते.) पीएच मॅनोमेट्री (ही एक अत्याधुनिक टेकनिक असून याद्वारे जठरातील ऍसिडची तीव्रता अचूक मोजली जाते.) अन्ननलिकेची मॅनोमेट्री नावाची तपासणी करून अन्ननलिकाव जठराला जोडणा-या झडपेचा सैलपणा पारखला जातो.

शस्त्रक्रियेची गरज कधी असते?
ऍसिडिटीमध्ये सुरुवातीला औषध घेऊन बरे वाटते. मात्र बरेचदा औषधोपचार घेऊनही रुग्णांना आराम मिळत नाही. अशावेळी शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय उरतो. अनेकदा सतत औषधं घेतल्याने त्याचे दुष्परिणाम शरीरावर व्हायला सुरूवात होते. तसेच अनेकदा दीर्घकाळ औषधे घेण्याची इच्छा नसते अशावेळी शस्त्रक्रिया हा एक पर्याय असतो.

  • कसा करावा ॲसिडिटीपासून बचाव ?
  • मसालेदार अन्नपदार्थ खाणे टाळावे.
  • आहारात जास्तीत जास्त भाज्या व फळांचा समावेश करावा.
  • भरपूर पाणी व द्रव पदार्थांचे सेवन करून शरीर हायड्रेटेड ठेवावे.
  • अन्न चावून चावून सावकाश खावे.
  • पुरेसी म्हणजे किमान 6 ते 8 तासांची झोप घेणे
  • जेवणानंतर लगेच झोपू नये. जेवण व झोप यात कमीत कमी 2-3 तासांचे अंतर ठेवावे.
  • गरज नसताना औषधे घेणे टाळावे.
  • भरपूर चालणे, योगासने, पोहणे इत्यादी व्यायाम करणे

अधिक माहितीसाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क –
पत्ता: जाधव सर्जिकल क्लिनिक, नांदेपेरा रोड, वणी
पूर्व नोंदणी साठी संपर्क: 9511860868, 9730106428
किंवा: समर्थ मेडिकल, नांदेपेरा रोड, वणी येथे संपर्क साधावा. 

सर्जन डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) हे मुळचे वणीतील ढुमे नगर/ गुरुनगर येथील रहिवाशी असून त्यांनी शालेय शिक्षण वणीतच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी GMC नागपूर येथून आपले MBBS व MS चे शिक्षण पूर्ण केले. त्यांना दिल्लीतील सुप्रसिद्ध FMAS (FELLOWSHIP IN Minimal Access Surgery) ही फेलोशिप मिळाली आहे. शिवाय त्यांना Coloproctology या विषयातील ISCP International Society of Coloproctology द्वारा फेलोशिप मिळालेली आहे. सध्या ते नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्जन म्हणून पूर्णवेळ सेवा देतात. तसेच दर रविवारी वणी येथे वैद्यकीय सेवा देतात.

हे देखील वाचा: 

मूळव्याध म्हणजे काय? मुळव्याध कसा बरा होतो… वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉक

Comments are closed.