सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः महाराष्ट्र शासनाच्या स्थुलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड अम्बेसेडर व सुप्रसिद्ध डायटेशिअन डॉ. जगन्नाथ दिक्षित यांचे उद्या शनिवारी वणीत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता स्थानिक शेतकरी मंदिर परिसरातील वसंत जिनिंग लॉन्स येथे हे व्याख्यान होत आहे. या व्याख्यानात ते विनासायस लठ्ठपणा कमी करण्याचा तसेच मधुमेहमुक्तीचा मुलमंत्र देणार आहेत. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अधिकारीवर्ग आणि गणमान्य व्यक्तींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना गेल्या काही वर्षांपासून विविध आजारांनी ग्रासलेलं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्थुलता. लठ्ठपणा हे विविध आजारांना आमंत्रण देते. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब यासारखे रोग होतात. अनेक लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपाशी राहण्याचा पर्याय स्वीकारतात मात्र डॉ. दिक्षित यांचा विनासायास लठ्ठपणा कमी करण्याचा फॉर्म्युला महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. यात फक्त तीन महिन्यात कोणत्याही प्रकारचे डायटिंग न करता आठ किलो पर्यंत वजन कमी करता येऊ शकतं. या व्याख्यानात ते लठ्ठपणा कमी कऱण्याच्या व आजारपणाला दूर पळवण्याचा फॉर्म्युला लोकांसमोर मांडणार आहेत.
या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली असून या कार्यक्रमाला अधिकारी वर्ग तसेच गणमान्य व्यक्तींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच वणी मारेगाव व झरी तालुक्यात ग्रामीण भागात जाऊन कार्य करणा-या डॉक्टरांचा देखील या कार्यक्रमात सन्मान केला जाणार आहे. अशी माहिती डॉक्टर्स असोसिएशनने डॉ. महेंद्र लोढा यांनी दिली.
वणी शहरात पहिल्यांदाच हे मोफत व्याख्यान होत आहे. त्यामुळे गर्दी लक्षात घेता नागरिकांनी वेळेपूर्वी व्याख्यानाला हजर राहावे. सामाजिक कार्यकर्ते व असोसिएशनचे डॉ. महेंद्र लोढा, डॉ. शिरीष ठाकरे, डॉ. महाकुलकार, डॉ. रमेश सपाट, डॉ. वडोदेकर, डॉ. मत्ते, डॉ. एकरे, डॉ. विकास हेडाऊ, डॉ. पारशिवे, डॉ. कुमरवार, डॉ. निमजे, डॉ. जुनगरी, डॉ. राहुल खाडे, डॉ. डाखोरे, डॉ. झाडे व असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेण्याची विनंती केली आहे.