25 लाखांच्या कथित खंडणी प्रकरणी डॉ. लोढा यांची पोलीस ठाण्यात तक्रार

जितेंद्र कोठारी, वणी: नवजात बाळ प्रकरणी 25 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप करत डॉ. महेंद्र लोढा यांनी आज वणी पोलीस ठाण्यात बाळाच्या पालकांविरोधात तक्रार दिली. तसेच नवजात बाळाचा योग्य तो उपचार न केल्यामुळे व बाळाला बेजबाबदारीने वागवल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत याची योग्य चौकशी करून कारवाई करावी अशी देखील मागणी त्यांनी तक्रारीतून केली. तक्रारीसह त्यांनी पुरावा म्हणून कॉल रेकॉर्डिंग क्लिप पोलिसांकडे जमा केल्या आहे. या प्रकरणी नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत असून बाळाच्या पालकांनी केलेल्या बदनामीमुळे वैद्यकीय प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप करीत या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार न शोधल्यास संपूर्ण जिल्ह्यातील डॉक्टर रस्त्यावर उतरणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

तक्रारीत म्हटले आहे की बाळाचे पालक नरेंद्र शंकर बुजाडे व बाळाची आजी कौशल्या शंकर बुजाडे यांनी खोटे आरोप लावून या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून बदनामीची भीती दाखवत 25 लाखांच्या खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. पैसे न दिल्यामुळे बाळाच्या पालकांनी काही लोकांना हाताशी घेऊन बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दिनांक 8 ऑगस्ट रोजी बाळाची आजी कौशल्या बुजाडे यांनी डॉ. लोढा यांच्या मारेगाव येथील एका सहका-याला घरी बोलावले व त्यांच्या माध्यमातून प्रकरण मिटवण्यासाठी 1 कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास बाळाच्या आजीने डॉ. लोढा यांच्या वणीतील ठमके नामक एका सहका-याशी संपर्क साधत 50 लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास डॉक्टर लोढा यांचा वैद्यकीय व्यवसाय व राजकीय अस्तित्व नष्ट करू धमकी दिली.

13 ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास बाळाच्या आजीचे ठमके यांच्या फोनवरून डॉक्टर लोढा यांच्याशी बोलणे केले. यावेळी बाळाच्या आजीने फोनवर 25 लाख रुपये नगदी व बाळाचा संपूर्ण वैद्यकीय खर्चाची मागणी केली. डॉक्टर लोढा यांनी बाळाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली, मात्र 25 लाख रुपये देण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर सं. 6.30 वाजताच्या सुमारास बाळाच्या आजीने डॉ. लोढा यांच्या मारेगाव येथील सहका-याला कॉल करून 25 लाख दिल्यास तक्रार परत घेणार व रात्रीच वणी सोडून जाणार असल्याचे सांगितले. तसेच पैसे न दिल्यास दुस-या दिवशीपासून त्यांच्याविरोधात मोहीम उघडली जाणार अशी धमकी देखील दिली.

पुरावा म्हणून ऑडिओ क्लिप पोलिसांकडे जमा
या प्रकरणी पुरावा म्हणून डॉ. लोढा यांनी बाळाच्या आजीसोबत झालेल्या संवादाची कॉल रेकॉर्डिंग सादर केली आहे. तसेच त्वरित गुन्हा दाखल न झाल्यास वणीसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील डॉक्टर आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणी वणी पोलीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाळाच्या पालकांनी आधी पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिली. त्यानंतर त्यांनी तक्रार मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व ठिकठिकाणी मोर्चे काढत बदनामी केली. यामुळे मानसिक त्रास होत असून वैद्यकीय बदनामीमुळे व्यावसायिक नुकसान होत आहे. त्यामुळे बाळाचे वडील व आजी त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी डॉ. लोढा यांनी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.