निकेश जिलठे, वणी: गेल्या पंचवार्षिकमध्ये विविध सामाजिक कार्याने सर्वाधिक चर्चेत आलेले डॉ. महेंद्र लोढा यांनी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहे. गेला काही काळ ते राजकारणापासून अलिप्त होते. मात्र नुकतेच काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले होते. यात डॉ. महेंद्र लोढा यांनी देखील अर्ज भरत रेसमध्ये असल्याचे दाखवून दिले. जर पक्षाने तिकीट दिली तर वणी विधानसभेचा पुढचा आमदार हा काँग्रेसचा असेल, असा विश्वास त्यांनी ‘वणी बहुगुणी’जवळ व्यक्त केला.
डॉ. महेंद्र लोढा यांची परिसरात एक सुप्रसिद्ध डॉक्टर आणि सर्जन म्हणून ओळख आहे. 8 वर्षाआधी त्यांनी राजकीय भूमिका घेत राजकारणात उडी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना प्रदेश सरचिटणीस हे राज्यस्तरावरील पद दिले. त्यानंतर त्यांनी गावखेड्यात सामाजिक कामांचा धडाका लावला. त्यांच्या पुढाकारातून व लोकसहभागातून गावोगावी रस्ते, तळे, पाईपलाईन, बोअरवेल, लायब्रेरी, सोलर लाईट असे विविध कामे करण्यात आलीत. तेजापूर येथे तर लोकसहभागातून त्यांनी पूल बांधून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या कार्याची तेव्हा संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली होती.
जनसंवाद यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद
जानेवारी 2022 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. गेल्या वर्षी माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात व डॉ. महेंद्र ला मुख्य संयोजनात कॉग्रेसतर्फे भव्य जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या यात्रेला विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. अलिकडच्या काळात ते राजकारणापासून काहीसे अलिप्त होते. मात्र त्यांचा काँग्रेसच्या विविध उपक्रम व कार्यक्रमात सहभाग असतो. लवकरच विधानसभेचा बिगूल वाजणार आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वणी विधानसभेत प्रचंड आघाडी घेतल्याने काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांनी आपापली दावेदारी दाखल केली.
विरोध पक्षनेता म्हणून प्रभावी काम
डॉ. महेंद्र लोढा यांचा व्यवसायाच्या निमित्ताने संपूर्ण मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याचा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये एक विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी प्रभावीपणे भूमिका बजावली. सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आंदोलन केलेत. त्यांनी शेतक-यांसाठी केलेले उपोषण चांगलेच गाजले होते. त्यामुळे डॉ. महेंद्र लोढा यांचा दावा प्रभावी मानला जात आहे.
यावेळी विधानसभेत काँग्रेसचे पारडे चांगलेच जड आहे. त्यामुळे तिकीटासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या देखील मोठी आहे. आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.