डॉ. राणानूर सिद्दीकी यांचा नगर सेवा समितीद्वारे सन्मान
गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ समाजकार्यात सक्रिय
निकेश जिलठे, वणी: नगर सेवा समिती वणी द्वारा “सन्मान कार्याचा,वैभव शहराचा” या उपक्रमाअंतर्गत वणीतील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणानूर सिद्दीकी यांचा सन्मान करण्यात आला. नगर सेवा समितीचा हा पाचवा सन्मान आहे. रविवारी 29 ऑक्टोबरला साई मंदिरसमोर संध्याकाळी 6 वाजता एका अनौपचारिक सोहळ्यात वणी पब्लिक स्कुलच्या प्राचार्य डॉ. सुषमा खनगन त्यांचा हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. सुषमा खनगन होत्या तर प्रमुख अतिथी प्राचार्य रोहीत वनकर होते. यावेळी मुख्याध्यापिका उमा राजगडकर,समितीचे अध्यक्ष नामदेवरावजी शेलवडे, उपाध्यक्ष सुभाष आडे, समितीचे सचिव दिलीप कोरपेनवार, नारायणराव गोडे, राजूभाऊ तुराणकर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक रमेशजी बोबडे, दिनकर ढवस, गुलाबराव खुसपुरे, राजेंद्र साखरकर, कृष्णराव ठवकर, संजय पिदूरकर, ढवस काकाजी, अरूण वाघमारे समितीचे पदाधिकारी, योग समितीचे सर्व सदस्य आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचं संचालन रमेश बोबडे यांनी केलं तर आभार राजूभाऊ तुराणकर यांनी मानले.
गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळ डॉ. सिद्दीकी या समाजकारणात आहेत. १९९२ ला त्यांनी नुरजहाॅ बेगम चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, पर्यावरण, वैद्यकीय सेवा, रोजगार इत्यादी क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. समाजातील वंचित घटकातील मुला मुलींना निवासी शिक्षणाची सोय व्हावी यासाठी त्यांनी शाळा आणि महाविद्यालयाची स्थापना केली. पर्यवरणाच्या रक्षणासाठी रोपवाटिका निर्मिती तसेच वृक्षलागवड कार्यक्रम त्यांनी राबवला. गरीब मुलींचे लग्न लावून देणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना शिलाई मशिन सारखे प्रशिक्षण देणे असे विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. यात मैलाचा दगड ठरलेलं त्यांचं काम म्हणजे देशातील फक्त मुलींसाठी काढलेलं पहिलं लॉ कॉलेज. आदिवासी मुलींना कायद्याचे शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा इथे हे कॉलेज सुरू केले.
विविध उपक्रमाद्वारे समाजसेवा करणा-या राणानूर सिद्दीकी यांचा महाराष्ट्र शासनाद्वारे सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. यासोबतच त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.