ढोसून झाला धीट… दारुच्या नशेत मारली वीट…

पानठेल्यावर खर्रा खायला गेलेल्या तरुणाला मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: कामावरून परत आल्यावर पानठेल्यावर खर्रा घेण्यास गेलेल्या एका तरुणाच्या डोक्यावर एकाने मद्यधुंद अवस्थेत वीट मारली. गुरुवारी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील बुरांडा (खडकी) येथे ही घटना घडली. या प्रकरणी बाप व त्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, मनोज सूर्यभान पावले (29) हा बुरांडा (खडकी) येथील रहिवासी असून तो मिस्त्री काम करतो. गुरुवारी तो नेहमीप्रमाणे संध्याकाळी कामाहून घरी परत आला. त्यानंतर तो गावातील एका पान टपरीवर खर्रा खाण्यास गेला. तिथे शंकर वारलुजी वराडकर (35) हा दारुच्या नशेत आला. त्याने मनोजशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेला. शंकरने टपरीच्या बाजूला असलेली वीट उचलली व मनोजच्या डोक्यावर मारली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी शंकर सोबत त्याचा मुलगाही होता. त्याने मनोजला कॉलर पकडून खाली पाडले व त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच परत येथे भेटला तर जीवे मारतो अशी धमकी देत बाप लेक तिथून निघून गेले. डोक्यावर प्रहार झाल्याने मनोजला चक्कर आली. दरम्यान त्याचा लहान मुलगा तिथे आला. त्याने आजोबाला व नातेवाईकाला तिथे बोलावले. मनोजने मारेगाव पोलीस ठाणे गाठले व आरोपी बापलेकाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी बीएनएसच्या कलम 118(1), 351(2), 351(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.