बहुगुणी डेस्क, मारेगाव: रविवार दिनांक 23 मार्चची सकाळची वेळ. मारेगाव तालुक्यातील पार्डी येथील वर्धा नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात तरंगत असल्याचा दिसला. पाहता पाहता ही बातमी सर्वत्र पसरली. मग पार्डी येथील पोलीस पाटील यांनी मारेगाव पोलिसांना ही बाब कळविली. मारेगाव पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचलेत. त्यांनी मृतदेहाला बाहेर काढले.
पोलीस पाटील प्रकाश बालाजी बदखल यांची पार्डीला वर्धा नदीच्या काठावर शेती आहे. नित्यक्रम म्हणून ते आज रविवार दिनांक 23 मार्चला सकाळी 7.30 वाजता पाण्याची मोटर सुरु करण्याकरिता शेतात गेले. तेव्हा ही धक्कादायक बाब त्यांच्या नजरेस पडली.
त्यांच्या शेताच्या बाजूलाच नदीमध्ये एका अनोळखी इसमाचे प्रेत तरंगताना प्रकाश बदखल यांना आढळून आले. या इसमाचे वय अंदाजे 35 ते 40च्या दरम्यान असावे. त्याच्या अंगात निळी पॅण्ट आणि काळा-लालसर चेकचा शर्ट घातलेला होता.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. सदर व्यक्तीची ओळख पटलेली नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गावंडे यांच्या मार्गदर्शनात जमादार शंकर बारेकर करत आहे.
Comments are closed.