बहुगुणी डेस्क, वणी: जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी टॉमीने हल्ला करण्यात आला. बुधवारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी रात्री तालुक्यातील ढाकोरी बोरी येथे ही घटना घडली. या हल्ल्यात तरुणाचे डोके फुटले. या प्रकरणी आरोपी भास्कर रामचंद्र वासेकर विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आकाश दादाराव आसुटकर (25) हा ढाकोरी (बोरी) येथील रहिवासी असून तो शेती करतो. त्याच्या घराशेजारीच आरोपी भास्कर रामचंद्र वासेकर (47) राहतो. या दोघांमध्ये जुना वाद आहे. यातून त्यांच्यात नेहमीच भांडण होत असते. बुधवारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास आकाश हा घरासमोर एका नातेवाईकासोबत मोबाईलवर बोलत होता. दरम्यान तिथे भास्कर दारुच्या नशेत पोहोचला.
त्याने आकाशला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा आकाशने शिविगाळ करण्याबाबत विचारणा केली. त्यावर भास्करने आकाशच्या दोन थापडा मारल्या व माझे कोण काहाही वाकडे करू शकत नाही असे म्हणत तो तिथून निघून गेला. त्यानंतर आकाश हा त्याच्या भावासह गावातील रस्त्याने जात होता. दरम्यान समोरून भास्कर हाती लोखंडी टॉमी घेऊन आला व आकाशच्या डोक्यावर लोखंडी टॉमीने वार केला.
डोक्याला मार लागल्याने आकाशचे डोके फुटले. त्यानंतर भास्करने शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या आकाशने वडिलांना सोबत घेऊन शिरपूर पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी आरोपी भास्कर विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी भास्कर वासेकर विरोधात बीएनएसच्या कलम 118(1), 351(2), 352 नुसार तक्रार दाखल केली. घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
Comments are closed.