दारुड्या पतीची पत्नीला फावड्याने बेदम मारहाण

मुलांच्या खाउचे पैसे दारूत उडवल्याने वाद

बहुगुणी डेस्क, मारेगाव: दारुड्या पतीने पत्नीला फावड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीच्या डोक्यावर जबर प्रहार केल्याने जखमी झाली. तालुक्यातील पहापळ येथे शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जावयाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

आरोपी पती (45) हा पहापळ येथील रहिवासी आहे. तो त्याची पत्नी (38) व दोन मुलांसह गावातच रहातो. आरोपीला दारू पिण्याची सवय आहे. पत्नीने मुलांच्या खाऊसाठी काही पैसे काढून ठेवले होते. मात्र पतीने हे पैसे दारू पिण्यात खर्च केले. शनिवारी दिनांक 11 मे रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास पत्नीने पतीला मुलांच्या खाउचे पैसे खर्च करण्याबाबत जाब विचारला.

पैशाची विचारणा केल्याने पतीला राग आला  त्याने पत्नीला फावड्याने डोक्यावर मारहाण केली. त्यामुळे पत्नी जखमी होऊन अंगणात पडली. दरम्यान आई बेशुद्ध झाल्याचे पाहताच दोन्ही मुलांनी ही बाब गावात राहणा-या आपल्या आजोबांना सांगितली. घटनेची माहिती मिळताच मुलीचे वडील तातडीने घरी गेले. तिथे त्यांना त्यांची मुलगी जखमी अवस्थेत आढळली.

त्यांनी तातडीने मुलीला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केली. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून मुलीला सीटी स्कॅन करीता रेफर केले. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जावयाविरोधात भादंविच्या कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मारेगाव पोलीस तपास करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.