बाहेर वातावरण टाईट, बेवड्यांचे ‘टाईट’ होण्याचे वांदे

तळीरामांचा 'कुणी कॉर्टर देता का कॉर्टर'चा टाहो

0

जब्बार चीनी,वणी: ‘कुणी घर देता का घर’ हा नटसम्राट या नाटकातील संवाद जवळपास प्रत्येकांनाच माहिती असेल. निवा-यासाठी विनवणी करताना आलेला हा संवाद अजरामर आहे. यासारखीच विनवणी करण्याची प्रचिती सध्या वणीत तळीरामांवर आलेली आहे.

जे दारू पिल्याशिवाय एक दिवससुद्धा राहू शकत नाहीत, असे अनेकजण इकठे तिकडे धाव घेत दारूची शोधाशोध करीत आहेत. यासाठी त्यांची जास्तीचे पैसे मोजण्याससुद्धा तयारी आहेत. मात्र, आता बहुतांश ‘अड्ड्या’वर अनोळखीना ‘नो एन्ट्री’ असल्याने बेवड्यांचे हातपाय थरथरायला लागले असून त्यांचा ‘कुणी कॉर्टर देता का कॉर्टर’ असा टाहो दिसून येत आहे.

राज्यात लॉकडाऊन जाहीर होताच बार व वाईन शॉप बंदीचे आदेश देण्यात आले. तेव्हापासून दारूची सर्व दुकाने बंद करण्यात आली. रेस्टॉरंट, ढाबे बंद केल्यानंतरही ग्रामीण भागात अनेकांना सहजपणे दारू मिळत होती. मात्र, लोकांनी रस्त्यावर फिरणे, गर्दी कमी न केल्याने शासनाकडून 31 मार्च पर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यातच केंद्र सरकारने 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केल्याने परिस्थिती आणखीनच ‘टाईट’ झाली. त्यामुळे दररोज दारू पिणा यांना चांगलीच अद्दल घडली असून त्यांचे ‘टाईट’ होण्याचे वांदे झाले आहे.

अवैध दारूची दुप्पट तिप्पट भावान विक्री

सध्या शहरात दीपक चौपाटी, गोकुल नगरजवळ, ब्राम्हणी फाटा, पंचशील चौक, गायकवाड फैल व जैताई नगर इत्यादी काही ठिकाणी चढ्या दराने चोरट्या मार्गाने दारूविक्री सुरु आहे. देशी दारूचा 55 रु चा पव्वा 150 ला, नंबर 1 व ओसी ब्लू ची 150 ची कॉर्टर 350 ते 400 ला विकली जात आहे. मात्र आता शहरातलाही स्टॉक जवळपास संपलाये. त्यामुळे अनेकांनी ग्रामीण भागात व तालुक्याच्या ठिकाणी दारूसाठी आपला मोर्चा वळवला आहे. शहरात व ग्रामीण भागात अजूनही अनेकांनी ‘इमरजन्सी’साठी दारूचा साठा ठेवला आहे. या दारूची आपल्या ओळखीच्या लोकांच्या माध्यमातूनच विक्री केली जात आहे.

गरीबाला गत नाही… 

देशी दारून ही गरीबांची दारू म्हणून ओळखली जाते. याची किंमत कमी असल्याने गरीब, मजूर वर्गामध्ये या दारूची विक्रीचे प्रमाण अधिक आहे. मात्र या दारूनेही बंदचा फायदा घेत चांगलाच ‘पंच’ मारला आहे. सध्या 52 रुपयांच्या देशी पव्व्याचे दर 150 पर्यंत गेले आहे. या दारूचे दरही ब्लॅकमध्ये जवळपास तिप्पट झाल्याने ती विकत घेणे आता त्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. त्यामुळे गरीबाला गत नाही असे म्हणताना हा वर्ग दिसत आहे.

पैसेवाल्यांचाही घसा कोरडाच 

सध्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने अवैध विक्री करणा-यांचाही स्टॉप सध्या संपलेला आहे. त्यामुळे पैसे असले तरी ही त्यांना ती विकत घेता येत नाही. तसेच ज्या ठिकाणी उपलब्ध असेल तिथे ओळखी शिवाय दारू मिळत नाही त्यामुळे त्यांचा ही घसा सध्या कोरडाच आहे.

अनोळखींना गावात नो एन्ट्री

कोरोनाच्या बाबतीत जनजागृती झाल्याने जवळपास सर्वच गावांनी अनोळखी व्यक्तींना नो एन्ट्री केली आहे. गावात येताच त्यांना कशासाठी आला आहात, याची विचारणा केली जात आहे. अनेकजण दारू खरेदीसाठी येत असल्याची माहिती गावक-यांना मिळत असल्याने त्यांनी आता अनोळखींना गावात येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे दारूड्यांची चांगलीच फजिती झाली असून, आता त्यांना पुढील २० दिवस तरी विनादारूचे काढावे लागणार आहेत.

दारू बंद आहे… ! हे वास्तव आता अनेक तळीरामांनी स्वीकारले असून त्यांनी आता दारू बंद केलेलीच बरी या गोष्टीकडे मनाचा कल नेला आहे. वारंवार सांगून, समुपदेशन करून, उपचार करूनसुद्धा अनेकजण दारू पिणे सोडत नाहीत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीपासून दारूची दुकाने, बार, रेस्टोरन्ट बंद असल्याने बेवड्यांना चांगलीच अद्दल घडत आहे. संचारबंदीच्या कारणाने का होईना अनेकांचा घसा कोरडा राहत असल्याने आता दारू बंद करून कायमच घसा कोरडा ठेवण्याचा निर्णयही काही तळीरामांनी घेतला आहे. आता त्यांचा हा संकल्प किती दिवस  टिकेल हे बार व वाईन शॉप उघडल्यावरच कळेल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.