मारेगाव तालुक्यातील कुंभा परिसरात भूकंप सदृष्य धक्का
भांडे पडले, बेड हलला, खिडकी वाजल्याच्या रंगल्या खमंग चर्चा
निकेश जिलठे, वणी: मारेगाव तालुक्यातील कुंभा परिसराला शुक्रवारी रात्री भूकंप सदृष्य धक्का जाणवला. हा धक्का सौम्य होता. तसेच यात कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झाली नाही, मात्र परिसराला भूकंपाचा धक्का बसल्याची चर्चा रंगल्याने यामुळे काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. शुक्रवारी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा 10 वाजताच्या सुमारास हा धक्का जाणवला. सकाळी याबाबत प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना गावक-यांनी याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मारेगाव येथील तहसिलदार उत्तम निलावाड यांनी पिसगाव, सिंधी, कुंभा इत्यादी गावात भेट देत नागरिकांशी चर्चा केली. या भूकंपाची नागपूर येथे नोंद झाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे हा भूकंप नसून साधे कंपन असल्याचे मानले जात आहे. या धक्क्यामुळे 25 वर्षापूर्वी वणी तालुक्यातील बोर्डा येथील कथित भूकंपाच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
रात्री 10.10 वाजताच्या सुमारास कुंभा व परिसरातील गावातील येथील नागरिक जेवण करून घरी निवांत होते. दरम्यान काही लोकांना भूकंप सदृष्य धक्का जाणवला. हा धक्का अवघ्या काही सेकंदाचा होता. धक्का जाणवताच लोक घरातून बाहेर आलेत. त्यांनी याबाबत एकमेकांना आपला अनुभव सांगितला. या धक्क्यामुळे कुणाच्या घरचे भांडे पडले, कुणाच्या घरचा बेड हलला तर कुणाच्या घराच्या खिडकीचे काच वाजले, असा वेगवेगळा दावा करण्यात आला. तर काहींनी केवळ हलल्यासारखे झाल्याचा अनुभव सांगितला. कुणी सोशल मीडियातून याबाबत पोस्ट केल्यात.
गावक-यांनी सकाळी याबाबत तालुका प्रशासनाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार उत्तम निलावाड हे त्यांच्या सहका-यांसह कुंभा या भागात गेले. त्यांनी पिसगाव, कुंभा, सिंधी, चिंचाळा इत्यादी गावातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी नागरिकांना घाबरू नये असे आवाहन केले. तसेच याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिका-यांना दिली.
भूकंप झाल्याची नोंद नाही
नागपूर येथे भूकंप मापक यंत्र आहे. मात्र येथील यंत्रावर या धक्याची कोणतीही नोंद झालेली नाही. नागपूर येथील यंत्रावर किमान 3 रिस्टर स्केलचा (भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक) धक्का असल्यास त्याची नोंद होते. मात्र हा धक्का अतिशय सौम्य होता. तसेच हा धक्का केवळ काही भागांपुरता होता. त्यामुळे हा केवळ भूगर्भातील कंपनामुळे झालेला सामान्य धक्का असल्याचे सध्या मानले जात आहे.
भुकंप असल्याची शक्यता नाही – सुरेश चोपणे, भूगर्भ संशोधक
याबाबत ‘वणी बहुगुणी’ने परिसरातील भूगर्भ संशोधक प्रा. डॉ. सुरेश चोपणे यांना संपर्क साधला. त्यांनी आपल्या परिसरात माईन्स, डॅम तसेच इतर काही बाबींमुळे असे भुकंप सदृष्य धक्के जाणवतात. परिसरात मोठ्या प्रमाणात चुनखडक आहेत. भूगर्भातील चुनखडक किंवा इतर काही खडकांमध्ये पाणी गेल्यास हे खडक विरघळतो व या भागात पोकळी निर्माण होते. त्यामुळे हा भाग खाली खचतो. त्यामुळे असे धक्के जाणवतात. तसेच भूगर्भातील रेती, वाळू खचल्यास किंवा परिसरात डॅम असल्यास त्याचे पाणी खडकात जाऊन भुस्तर भंगतात. त्यामुळे असे धक्के जाणवू शकतात, अशी माहिती सुरेश चोपणे यांनी दिली.
25 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या
25 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 साली वणी तालुक्यातील बोर्डा (घोन्सा) परिसरात भुकंप सदृष्य धक्के जाणवले होते. तसेच या ठिकाणी भूगर्भातून धूर देखील निघला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या परिसरात चुनखडक आहे. तसेच बोर्ड्याजवळ एक तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव भरतो. मात्र पावसाळा झाला की काही दिवसातच या तलावाचे पाणी आटते. या तलावा खालील जमीन पोकळ आहे. त्यामुळे पाणी झिरपून चुनखडकांपर्यंत जाते. त्यामुळे जमिनीखाली असलेला चुनखडक विरघळला. परिणामी तयार झालेल्या पोकळीमुळे हा भाग खचला व या भागात भुकंप सदृष्य धक्के जाणवले. तसेच चुनखडक पाण्याच्या संपर्काने विरघळल्याने कार्बन डाय ऑक्साईड हा वायू तयार झाला. हा वायू भूगर्भातून बाहेर आला. असे पुढे संशोधनातून समोर आले होते. रासा, घोन्सा, बोर्डा या भागात दर दोन तीन वर्षातून एकदा असा भूकंप सदृष्य धक्का बसतो, अशी माहिती स्थानिकांनी दिली. कुंभा येथील कथित भूकंपाच्या चर्चेमुळे बोर्डा येथील कथित भूकंपाच्या अनेकांच्या आठवणी जाग्या झाल्यात.
Comments are closed.